डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा   

मंचर, (प्रतिनिधी) : हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात गुरुवार केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून गत वर्षी ३३.०६ टक्के होता. आंबेगाव, जुन्नर, शिरूर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांसह पारनेर, श्रीगोंदा कर्जत या नगर व करमाळा या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांना ही येणार्‍या कालखंडामध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. अन्यथा पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.
 
सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता पाहता येणार्‍या काळात पाणी संकट येऊ शकते. अशी भीती जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्यात असणारे दरवर्षी पावसाळ्यात १०० टक्के हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण भरते. धरणातील पाणी उजव्या कालव्यातून आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील गावांला जाते. 
 
डाव्या कालव्याच्या माध्यामातून आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात जाते. तेथून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर कर्जत या तालुक्यांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यापर्यंत पाणी जाते. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात साठलेल्या पाण्यावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची शेती तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा शेतीचा प्रश्न सोडवण्याच्या डिंभे धरणाच्या माध्यमातून होतो. परंतु यावर्षी डिंभे धरणामध्ये केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. येणार्‍या कालखंडात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
मागील वर्षी यावेळी हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात ३३.०६ टक्के पाणी साठा होता. मात्र, यावर्षी गत वर्षीच्या तूलनेत कमी पाणीसाठी शिल्लक असल्याने काटकसरीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच शेती पिकांनाही जास्त पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.एकंदरीतच पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 
प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प नारायणगाव.
 

Related Articles