निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथराव वैद्य   

गाऊ त्यांना आरती , गिरीश चिटणीस 

स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान दिलेले हैदराबाद निजाम संस्थानातील कायदेपंडीत काशीनाथ सीताराम वैद्य यांचा जन्म ९ मार्च १८९० चा. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते विधानसभेवर निवडून आले. त्यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. राज्य पुनर्रचनेनंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी हरिजन सेवक संघ, भारत सेवक समाज अशा विधायक कार्य करणार्‍या संस्थांत त्यांनी स्वतःला झोकून देऊन समाजहिताची कामे केली. काशीनाथ वैद्यांची भाषणे व लेख अभ्यासपूर्ण, मुद्देसूद तरीही संयमीत असत. हैदराबाद संस्थानातील पहिल्या सार्वजनिक कार्यकर्त्यांपैकी एक न्यायमूर्ती केशवराव कोरटकर यांचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे.
 
काशीनाथ वैद्य एम.ए. एल.एल.बी., सुविद्य, शीलवान, शुद्ध आचरणाचे कायदेपंडीत होते. त्यांची योग्यता मुख्य न्यायाधीश होण्याची होती; परंतु स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तुत्वाने न्यायाधीशासारख्या उच्च पदावर जाण्यापासून स्वतःलाच रोखले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अशा असंख्य जणांनी जो त्याग करुन स्वतःच्या प्रगतीवर पाणी सोडले, तुरुंगवास पत्करला. हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्यातील सनदशीर राजकारणी व नेते म्हणून त्यांची १९३९ पासून भारतभर ख्याती निर्माण झाली. औरंगाबाद शहराजवळील सातारा खेड्यात त्यांचा जन्म झाला. मद्रास विद्यापीठाची एम. ए. व मुंबई विद्यापीठाची एल.एल.बी. या पदव्या मिळविल्यानंतर हैदराबाद शहरात वकिलीस व सार्वजनिक कार्यास त्यांनी प्रारंभ केला. लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. संस्थानातील शिक्षणात उर्दू भाषेची सक्ती असू नये आणि खाजगी शाळा व ग्रंथालये काढण्यावरील निर्बंध रद्द करावेत, अशा मागण्यांसाठी काम करणार्‍या हैदराबाद जनता शिक्षण परिषदेचे ते एक संस्थापक होते. संस्थानामध्ये लोकजागृतीचे काम करणार्‍या वामन नाईक आणि केशवराव कोरटकर यांच्या प्रारंभिक उपक्रमांना १९३० ते १९४० या दशकात त्यांनी आधार देत मोठे सहकार्य केले. हैदराबाद सामाजिक परिषद, विवेकवर्धिनी शिक्षण संस्था, मराठी संग्रहालय, अनाथ विद्यार्थीगृह या संस्थांच्या कारभारामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून त्या-त्या संस्थांसाठी योगदान दिले. त्या काळात हैदराबाद संस्थानामधील कार्यक्षेत्रामध्ये मराठवाड्याचा समावेश असलेल्या विदर्भ साहित्य संघ यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. संस्थानात असलेल्या अधिकारशून्य व नामधारी राजनियुक्त विधिमंडळाला थोडेतरी प्रातिनिधीक रूप लाभावे, यासाठी काशिनाथ वैद्य यांनी योगदान दिले. यासाठी हैदराबाद पोलिटिकल रिफॉर्म्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली. अनेक सार्वजनिक संस्थांशी संबंध, तसेच निजाम सरकारशी कायद्यांचा आधार घेऊन इतर भाषांबरोबरच मराठी भाषा संस्थानात जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी त्यांनी संघर्ष करून यश मिळविले होते.
 
शांततेच्या मार्गाने लढा
 
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतभर स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चालू होता. हा स्वातंत्र्यलढा शांतीच्या मार्गाने सत्याग्रह करून केला जात होता. भारतामधल्या संस्थानिकांच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच संस्थानामध्ये स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्व जागी जनता जागृत झाली असता काँग्रेसने संस्थानी चळवळीत अशा प्रकारच्या सत्याग्रही आंदोलनाला बळ देण्यास सुरुवात केली. हैदराबाद संस्थानामध्ये ९ सप्टेंबर १९३८ रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या सदस्यांची बैठक होऊन ही संस्था जातीय होऊ नये म्हणून निरनिराळ्या जातीतील राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांनी सदस्य होऊन संस्थेवर नियंत्रण ठेवावे, राष्ट्रीय स्वातंत्र्यचळवळीत यशस्वीपणे सहभाग घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत ही चळवळ पोहचवण्याचे धोरण ठरविण्यात आले; पण निजाम सरकारने २५ ऑक्टोबर १९३८ रोजी गॅझेट काढून पब्लिक सेफ्टी रेग्युलेशनच्या 13व्या कलमाखाली संस्थान काँग्रेस व सदर काँग्रेसचे मंडळ बेकायदा ठरविल्याचे जाहीर केले. या संस्था बेकायदा ठरविताना निजाम सरकार या गॅझेटात म्हणते की, हैदराबाद संस्थान काँग्रेस व तिचे मंडळ यांचा हेतु संस्थानच्या राज्यकारभारात बेदिली आणण्याचा असून, या संस्था कायदा व सुव्यवस्था राखण्याला घातक आहेत, तसेच त्याचे अस्तित्व संस्थानातील शांततेला व निरनिराळ्या जातीतील सलोख्याला बाधक होईल, याबद्दल सरकारची खात्री झाली आहे. त्यावर राजकीय संस्थांची संघटना करणे हा जनतेचा जन्मसिद्ध हक्क आहे. संस्थानच्या लाखो लोकांचे दारिद्र्य दूर करणे व त्यांची उन्नती करणे हे प्रश्‍न आमच्यापुढे असून संपूर्ण नागरिक स्वातंत्र्य व जबाबदार राज्यपद्धती मिळाल्यानेच ते सुटतील म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करतच राहणार असे काँग्रेसने घोषित केले.
 
पहिला सत्याग्रह
 
२३ डिसेंबर १९३८ रोजी काँग्रेस सत्याग्रह सुरू होऊन दोन महिने झाले होते.१६ डिसेंबर १९३८ रोजी काँग्रेस सत्याग्रह युद्ध मंडळाने सत्याग्रह पत्थरगडीजवळ केला. शहरामधील हा पहिला सत्याग्रह झाला. पुष्कळ गर्दी जमा झाली होती. ६ सत्याग्रहींना अटक करून नेण्यात आले. सतराव्या तुकडीने १९ मे १९३८ रोजी सत्याग्रह क्लॉक टॉवर, सुलतान बझारजवळ केला, त्यावेळी १५०० च्या वर लोकांच्या जमाव होता. पाच सत्याग्रहींना अटक करून नेण्यात आले. दोन महिने सत्याग्रह सुरू होऊन पूर्ण झाल्याने २३ डिसेंबर रोजी काँग्रेस सत्याग्रह दिन पाळण्यात आला. त्यातच सत्यागृहात अटक करण्यात आली. या दिवशी एक प्रसिद्ध पुढारी सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे लोकांत एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले होते. त्यामुळे पुष्कळ लोक पत्थरगडीजवळ जमा झाले होते. काशीनाथराव वैद्य यांचे घरी सौ. धूत आणि श्री. दामोदरदास यांनी काशीनाथराव वैद्य, गोपाळ शास्त्री देव व श्री. एम. रामचंद्रराव यांना आरती ओवाळली. आरती ओवाळल्यावर सत्याग्रही मोटारीतून पत्थरगडीजवळ गेले. तेथे २००० लोकांचा जनसमुदाय हजर होता. वैद्य यांनी आपले पत्रक वाचून दाखवले व काँग्रेसश्रेष्ठींच्या सांगण्यावरून सत्याग्रह तहकूब केला आहे, असे जाहीर केले. पत्रक न वाचण्याबद्दल असिस्टंट पोलीस कमिशनर युनस मिर्झा यांनी काशिनाथ वैद्यांना सांगितले; परंतु वैद्यांनी वाचन तसेच चालू ठेवल्याने त्यांना व त्यांच्या दोन्ही सहकार्‍यांना अटक करून तुरूंगात टाकण्यात आले. याच दिवशी नऊ स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी या सर्वांवर कोर्टात खटला चालेल असे जाहीर करण्यात आले.
 
साधारणपणे सव्वा महिन्यानंतर म्हणजेच ३१ जानेवारी १९३९ च्या सुमारास काशीनाथराव वैद्य यांना दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. वास्तविक काशीनाथराव वैद्य यांनी निवेदन वाचून दाखवित ’सत्याग्रह’ बंद केला होता. सत्याग्रह तहकूब करण्यासाठीचे नेतृत्व त्यांनी केले होते. निझामाच्या माध्यमातून सर्वसामान्य सत्याग्रहींवर होत असलेला अन्याय थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. निजाम शासन आणि सत्याग्रही यांच्यामध्ये समेटाचे वातावरण निर्माण झाले असे वातावरण निर्माण झाले होते. निकाल देण्यास उशीर होतो याचाच अर्थ काशिनाथराव वैद्य यांची निर्दोष सुटका होईल असे वाटत असतानाच, संस्थानातील असंख्य जनसमुदायास ऐकून वाईट वाटेल असा निकाल देण्यात आला. सरकारचा कायदा त्यांनी मोडला म्हणून केवळ कर्तव्य म्हणून न्यायाधीशांनी काशीनाथराव वैद्य यांना शिक्षा दिली. काशीनाथराव यांच्यासारख्या कायदेपंडिताला शिक्षा झाली; पण या शिक्षेची तयारी जेव्हा काशिनाथराव सत्याग्रह करण्यास तयार झाले तेव्हाच त्यांनी केली होती. कारण त्यांच्या विवेकबुद्धीच्या हुकुमावरूनच ते ही शिक्षा सोसण्यास तयार झाले. त्यांच्या ’करेज ऑफ कन्व्हिक्शन बद्दल’ मात्र त्यांची समाजातल्या सर्वच थरातून स्तुतीच झाली, तसेच सुज्ञ, सदाचारी व कायदेपंडितांना जो कायदा मोडावासा वाटतो त्या कायद्याबद्दल पुन्हा एकदा विचार व्हावा असेच बहुतेकांना वाटले. काशीनाथराव यांना झालेली शिक्षा ऐकून जास्त वाईट वाटण्याला अजून एक कारण झाले. ’स्टेट काँग्रेस’ने त्यांचे ऐकून आपला सत्यागृह थांबविला. ही जर पडती बाजू स्टेट काँग्रेसने घेतली, तर निजामाच्या संस्थानिक सरकारनेही वातावरण शांत व आनंदी करण्यास सहाय्यभूत होणे आवश्यक होते; मात्र एक गोष्ट सरकारने मात्र चांगली केली. बाहेरून आलेल्या व शिक्षा झालेल्या सत्याग्रहांना सोडून दिले. वास्तविक ’आयंगार’ कमिटीचा रिपोर्ट ज्या दिवशी प्रसिद्ध होईल त्या दिवशी सर्वसत्याग्रही मुक्त होतील अशी अपेक्षा होती. ज्यांनी ’सत्याग्रहा’ला सुरुवात केली, त्यांना फक्त एक-एक महिन्याची शिक्षा आणि ज्यांनी तो बंद केला, त्यांना मात्र दोन वर्षाची कडक शिक्षा असा अजब न्यायाचा निकाल देण्यात आला.
 
सत्याग्रह व संघर्षाचे राजकारण करण्याचा काशीनाथरावांचा पिंड नव्हता; परंतु हैदराबाद स्टेट काँग्रेसवर जन्मापूर्वीच बंदी आल्याने १९३८ मध्ये झालेल्या स्टेट काँग्रेसच्या पहिल्या सत्याग्रहातील शेवटच्या तुकडीत त्यांनी सत्याग्रह केला; मात्र त्यांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाल्यानंतर सत्याग्रह परत घेतला गेला असल्यामुळे थोड्याच दिवसांत त्यांची सुटका करण्यात आली. स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवण्याचा एक प्रयत्न म्हणून १९४०-४१ मध्ये निझाम सरकारशी काशिनाथराव वैद्यांनी दीर्घकाळ पत्रव्यवहार केला; परंतु हा प्रयत्नही निष्फळ झाला. स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांना ज्या-ज्या ठिकाणी संस्थानिकांचे वर्चस्व होते, त्या-त्या ठिकाणी इंग्रज शासन आणि संस्थानिकांचे शासन या दोघांकडूनही त्रास सहन करावा लागला. ज्या ठिकाणी संस्थानिकांकडे प्रवेश नव्हता आणि फक्त इंग्रज शासन होते त्या ठिकाणी त्यामानाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून देऊन स्वातंत्र्य सैनिकांना काम करता आले. काशिनाथराव वैद्य यांचे निधन १३ मार्च १९५९ रोजी झाले. त्यांनी सर्व मानाची, सत्तेची पदे सोडून देशासाठी-स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले.

Related Articles