जेजुरी गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा घोषित   

जेजुरी : शासनाच्या पुरातत्व खात्याने महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिर व गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित केले, अशी माहिती श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिली.
 
महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून जेजुरीचा खंडोबा देशभर प्रचलित आहे. वर्षभरात खंडोबा देवाच्या आठ यात्रा भरतात. या वेळी लाखो भाविक, तर दररोज हजारो भाविक येथे देवदर्शन व कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येत असतात. महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून, यासाठी 349 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. यापैकी सुमारे १०९ कोटी रुपयांची विकासकामे पहिल्या टप्प्यात सुरू आहेत. जेजुरी गडकोट हे संपूर्ण राज्यस्तरावर राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासन निर्णयानुसार २४ ऑक्टोबर २००२ रोजी राज्य संरक्षित स्मारक घोषित केले आहे. याचे अधिकृत पत्र महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रालय संचालनालय विभागीय कार्यालय पुणेचे संचालक डॉ. विलास वाहने यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाला दिले आहे.
 
श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने ही माहिती पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, नित्य सेवेकरी, पुजारी सेवकवर्ग आदींना दिली. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, अनिल सौंडदे, पानसे, माजी विश्वस्त नितीन राऊत, संदीप जगताप, व्यवस्थापक आशिष बाठे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, बापू सातभाई, माधव बारभाई, सचिन मोरे, भाग्येश बारभाई, भाजपचे जेजुरी शहराध्यक्ष गणेश भोसले आदी उपस्थित होते.
 

Related Articles