चीनचे अमेरिकेवर ८४ टक्के ‘प्रत्युत्तर शुल्क’   

बँकाक/ वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘प्रत्युत्तर शुल्का’विरोधात अखेरपर्यंत लढा देणार असल्याचेे चीनने जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आयात शुल्क १०४ टक्के केले. त्यास, चीननेदेखील प्रत्युत्तर दिले असून अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवरील शुल्क ८४ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. दरम्यान अमेरिकेने चीनवरील शुल्क १०४ वरुन १२५ टक्के केले. ७५ देशांवरील प्रत्युत्तर तसेच ७५ देशांना शुल्कात ९० दिवसासाठी स्थगती दिली. या देशांवर १० टक्के शुल्क आकारले जाणार आहे.
 
ट्रम्प यांनी जगावर प्रत्युत्तर शुल्क लादताना चीनवर ३४ टक्के शुल्क आकारले होते. त्यानंतर, चीननेही ३४ टक्के आयात शुल्क लावले होते. यासोबतच, अमेरिकेच्या दबावापुढे आपण झुकणार नाही. अखेरपर्यंत लढा देऊ, असही म्हटले होते. यानंतर, ट्रम्प यांनी बुधवारी चीनवरील आयात शुल्क १०४ टक्के केले. आता चीननेदेखील आयात शुल्क ८४ टक्के केले आहे.चीनने अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवितानाच जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरुद्ध तक्रार केली होती. तसेच, अमेरिकन कंपन्यांवर आणखी निर्बंध आणले आहेत.
 
अमेरिकेने आर्थिक आणि व्यापार निर्बंध आणखी वाढविल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. पण, त्याचवेळी इतर देशांप्रमाणे व्हाईट हाऊसशी वाटाघाटी करणार की नाही हे सांगण्यास चीनने नकार दिला.जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झाल्याने आर्थिक मंदीची शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकेच्या प्रत्युत्तर शुल्क धोरणानंतर जागतिक शेअर बाजारात जोरदार पडसाद उमटले होते. 
 

Related Articles