चीनमध्ये वृद्धाश्रमाला भीषण आग; २० जणांचा मृत्यू   

बीजिंग : उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लाँगहुआ काउंटीमध्ये मंगळवारी रात्री एका वृद्धाश्रमाला भीषण आग लागली. या आगीत २० वृद्धांचा मृत्यू झाला.  तर १९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
गुआन सीनियर होम या वृद्धाश्रमात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री ९ वाजता ही आग लागली. आग लागली तेव्हा वृद्घाश्रमात २६० वृद्ध लोक राहत होते. यापैकी ९८ जण पूर्णपणे अपंग होते, तर ८४ जण ५० टक्के अपंग होते.  उर्वरित ७८ जण स्वतःची काळजी घेऊ शकत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने २० वृद्धांचा होरपळून मृत्यू झाला. तर १९ जण जखमी आहेत. रात्री ११ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. हे वृद्धाश्रम वृद्ध आणि दिव्यांग लोकांसाठी राहणे, भोजन आणि दैनंदिन देखभाल सेवा देण्याच्या उद्देशाने चालवले जात होते.दरम्यान, जानेवारीमध्येही जिआंग्शी प्रांतातील शिन्यु शहरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ३९ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ५० हून अधिक अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली. या दुर्घटनेमागे कोल्ड स्टोरेजचे बेकायदा बांधकाम असल्याचे सांगण्यात आले होते.

वृद्धाश्रमाचा व्यवस्थापक ताब्यात

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे चीनमधील नर्सिंग होमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 

Related Articles