पॅलेस्टिनींना तात्पुरता आश्रय देण्याची इंडोनेशियाची तयारी   

जकार्ता : इस्रायल-हमास युद्धात जखमी झालेल्या तसेच अनाथ झालेल्या गाझातील मुलांना आपला देश तात्पुरता निवारा देईल, अशी घोषणा इंडोनेशियाचे  अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी केली.मध्य पूर्वेच्या आठवडाभराच्या दौर्‍यादरम्यान अबू धाबीत बोलताना सुबियांतो  म्हणाले, जखमी, आघातग्रस्त आणि अनाथ मुलांना इंडोनेशियात हलवायचे असेल तर आम्ही त्यांना नेण्यासाठी विमाने पाठवण्यास तयार आहोत. 
 
इंडोनेशिया जवळपास एक हजार पीडितांच्या पहिल्या तुकडीला बाहेर काढण्यास तयार आहे. ते दुखापतीतून पूर्णपणे बरे होईपर्यंत आणि गाझात परत येण्याइतपत सुरक्षित होईपर्यंत इंडोनेशियातच राहतील. त्यांचे आम्ही कायमस्वरूपी पुनर्वसन करणार नाही. तुर्कस्तान, इजिप्त, कतार आणि जॉर्डन या देशांच्या दौर्‍यावर सुबियांतो आहेत. मानवतावादी कारणास्तव पॅलेस्टाईनचा स्वीकार करणार्‍या देशांशी नियोजित स्थलांतराबाबत सल्लामसलत करणार आहे. 
 
गाझामधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी इंडोनेशियाने आपली भूमिका वाढवावी, असे आवाहन इतर देशांनी केले आहे. जगातील सर्वाधिक मुस्लिम बहुल असलेला हा देश दीर्घकाळापासून पॅलेस्टाईनचा कट्टर समर्थक आहे; परंतु मला वाटते की यामुळे इंडोनेशिया सरकारला अधिक सक्रिय भूमिका बजावण्यास प्रोत्साहित केले जाईल, असे सुबियांतो म्हणाले.  
 

Related Articles