युद्धात रशियाला मदत करण्यार्‍या दोन चिनी नागरिकांना अटक   

कीव : युक्रेन सैन्याने पूर्व डोनेस्तक प्रदेशातील लढाईदरम्यान रशियन सैन्याला पाठिंबा देणार्‍या दोन चिनी नागरिकांना अटक केली. आणखी बरेच चिनी लोक रशियन सैन्यासोबत लढत असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. 
 
झेलेन्स्की म्हणाले, डोनेस्तकमधील तारासिवका आणि बिलोहोरिव्का या गावांजवळ सैन्याशी चकमक झाली, जिथे सहा चिनी सैनिकांनी युक्रेनियन सैनिकांचा सामना केला. यातील दोन चिनी सैनिकांना कैद करण्यात आले. ते युद्धात रशियाला पाठिंबा देत आहेत. रशिया परदेशी लोकांना आपल्या सैन्यात सामील होण्याची परवानगी देतो. त्यामुळे रशियन सैन्यात अनेक चिनी नागरिक असण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांच्या मते, इराण आणि उत्तर कोरिया व्यतिरिक्त रशियाला लष्करी मदत देणारा चीन हा तिसरा देश असेल.

युक्रेनचा दावा निराधार  

रशियाच्या आक्रमक सैन्यासोबत मोठ्या संख्येने चिनी नागरिक लढत असल्याचा युक्रेनचा दावा पूर्णपणे निराधार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सांगितले. युक्रेनचे संकट राजकीयदृष्ट्या सोडविण्यात चीनने रचनात्मक भूमिका बजावली आहे. चीन सरकार नेहमीच चिनी नागरिकांना संघर्षक्षेत्रापासून दूर राहण्यास सांगते, असेही ते म्हणाले. 
 

Related Articles