नाइट क्लब दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११३ वर   

सँटो डोमिंगो : कॅरेबियन देश डोमिनिकन रिपब्लिकमध्ये नाइट क्लबचे छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११३ वर पोहचला असून, २५५ हून अधिक जखमी आहेत. सैंटो डोमिंगोच्या जेट सेट नाइट क्लबमध्ये स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी लोकप्रिय मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ यांचा संगीताचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी नाइट क्लबमध्ये ४०० हून अधिक लोक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अचानक क्लबचे छत कोसळले. काही क्षणांत शेकडो लोक ढिगार्‍याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. ढिगार्‍यातून आतापर्यंत ११३ जणाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, आतापर्यंत केवळ ३२ मृतांची ओळख पटली आहे. अडीचशेहून अधिक जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनेला २४ तास उलटले तरी बचाव पथकांकडून अथक बचावकार्य सुरू आहे.या दुर्घटनेतील मृतांमध्ये मॉन्टेक्रिस्टि प्रांताच्या गव्हर्नर नेल्सी क्रूझ यांचाही समावेश आहे. 

Related Articles