पुण्यातील तपमान ४३ अंशांवर   

पुणे : पुणे शहर आणि परिसरात कमाल तपमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरात बुधवारी तपमान वाढीचा विक्रम झाला. एप्रिल महिन्यातील सर्वाधिक ४३ अंश कमाल तपमानाची नोंद लोहगावात झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तपमान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. आजही (गुरूवारी) वाढलेले तपमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 
 
लोहगावात मंगळवारी ४२.७ अंश कमाल तपमानाची नोंद झाली होती. काल त्यात वाढ होऊन ४३ अंशांवर पोहोचले. यासोबतच, शहर आणि उपनगराती कमाल तपमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला. वाढलेल्या तपमानामुळे घराबाहेर पडताना पुणेकरांना विचार करावा लागत आहे. काल दुपारी रस्त्यांवरील वाहने आणि नागरिकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. उष्ण व दमट वातावरणामुळे उकाडा वाढला होता. दुपारी त्यात अधिकच भर पडली. येत्या १५ एप्रिलपर्यंत अशीच परिस्थती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
त्यामुळे पुणेकरांना ऊन आणि उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. या काळात बहुतांश ठिकाणी कमाल तपमान ४० अंशावर असणार आहे. दरम्यान, एक कमी दाबाचा पट्टा पश्चिम राजस्तानपासून वायव्य विदर्भापर्यंत जात आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात हवामान कोरडे होते. पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती या जिल्ह्यात आज (गुरूवारी) उष्ण व दमट वातावरण असणार आहे. रात्रीचे तपमान सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. राज्यात चार दिवसांनतर मात्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
 
अकोल्यात विक्रमी तपमान
 
विदर्भातील अकोला जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी विक्रमी ४४.१ अंश किमान तपमानाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश जिल्ह्यातील कमाल तपमानाने ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. विदर्भात मागील चार दिवसांपासून वाढलेल्या तपमानामुळे सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. आणखी दोन दिवस विदर्भात वाढलेले तपमान कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 
 
कमाल व किमान तपमान 
 
लोहगाव ४३ अंश ३६ अंश
शिवाजीनगर ४१ अंश २४.६ अंश
पाषाण ४१ अंश २३.३ अंश
कोरेगाव पार्क ४१ अंश २६.४ अंश
मगरपट्टा ४० अंश २६.५ अंश
एनडीए ३९ अंश २२.३ अंश

Related Articles