शहरात अघोषित पाणीबाणी!   

दुरुस्तींच्या कामांमुळे पाणीपुरवठा बंद; नागरिक त्रस्त

पुणे :  देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. एक दिवस पाणीपुरवठा बंद राहिला की पुढील चार ते पाच पाणी कमी दाबाने येते. ही एक प्रकारे शहरात अघोषित पाणीबाणी निर्माण करण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
 
वाढत्या उष्णतेमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. शहराच्या उपनगरे आणि मध्यवर्ती भागातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याबाबत तक्रारी करत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.
 
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरण साखळीत पाण्याचा मुबलक साठा आहे. तरी सुध्दा शहरात पाणीबाणी का निर्माण केली जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. या वर्षी फेब्रुवारी २०२५ च्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये टँकरची मागणी वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ३८ हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मार्चमध्ये उष्णता वाढली तशी पाण्याचा वापरही वाढला. मार्च २०२५ मध्ये एकूण ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये टँकरची संख्या जवळपास १० हजारांनी वाढली आहे. यावरून शहरातील पाण्याच्या समस्येचा अंदाज येऊ शकतो. एप्रिल महिन्यात आणखी पाण्याची मागणी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहराची पाण्याची मागणी वाढत असताना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागापुढे आहे.
 
खडकवासला ते वारजे जलकेंद्र व होळकर जलकेंद्राला जाणार्‍या फेस-१ रॉ वॉटर लाईन, ड्रेनेज मेनलाईनच्या कामात तुटून गळती होत असल्यामुळे सदर वाँटरलाईनची दुरुस्ती करण्यासाठी सदर लाईन मंगळवारी (८) बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वारजे, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया, कर्वेनगर,  शिवाजी नगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड व  खडकीचा काही भाग येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तर गेल्या आठवड्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  या कालावधीमध्ये टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा करण्यास अडथळा निर्माण झाला होता.
 
६० वर्षे ही जुनी लाईन आहे. ही लाईन दुरूस्त करायला घेण्याची काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात चार वेळा पाइपलाइन फुटली होती. वारजे येथील १६०० एमएम पाइपलाइन दुरुस्ती पूर्ण झाली आहे. १ ते दीड तासाचे काम होते. परंतु लाईन मोकळी करायला पाच तासाचा वेळ लागला. जायका ड्रेनेज लाइनच्या कामामुळे पाइपलाइन पुटली होती. दांडेकर पूल येथील अतिदाबामुळे जुनी पाइप लाईन फुटत आहे. असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. पाणी पुरवठ्याला क्लोजर दिले की जास्त पंपिंग करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र पाण्याच्या टाक्या भरत नसल्याने नागरिकांना दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा करणे पाणीपुरवठा विभागाला शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
 
? देखभाल दुरुस्तीमुळे शहरात पाणी पुरवठा (क्लोजर) बंद ठेवण्यात येतो. दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली, त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे करताना शक्यतो क्लोजर   न ठेवण्याबाबत विचार केला जाणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Related Articles