दीनानाथ रूग्णालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये २९ मार्च रोजी गर्भवती महिलेला अत्यावश्यक उपचार देण्याची आवश्यकता असतानादेखील पैशांसाठी ते न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, रूग्णालयावर रूग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. रूग्णालयाबाहेर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून मोर्चा, आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे, रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक तसेच डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी रूग्णालय परिसरात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.  
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा सुशांत भिसे या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे, ५ मेपासुन राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून मोर्चे, आंदोलने व निदर्शने केली जात आहेत. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात सुरू असलेल्या या प्रकारमुळे रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक त्रास होत आहे. तसेच, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे. आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना ये-जा करण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. तसेच, रुग्णालयाच्या कार्यात व्यत्यय येत आहे.
 
रुग्णालयाच्या आवारात येणार्‍या रुग्ण, रूग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या हिताच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णास शांततामय वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णलायहॉस्पीटल पुणे व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे सांगत शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश घातले आहेत.  
 
रूग्णालयाच्य १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतरांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे.रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच, सुरक्षा अधिकारी यांना हे आदेश लागु होणार नाहीत. रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात आली आहे.

Related Articles