जुन्या वाहनांच्या लिलावातून महापालिकेला मिळाले सात कोटी   

पुणे: महापालिकेच्या वाहन विभागाकडील १५ वर्षापेक्षा अधिक जुन्या झालेल्या ४७३ वाहनांचा टप्प्याटप्प्याने लिलाव झाला आहे. त्यातून महापालिकेला सुमारे ६ कोटी ८५ लाख रूपये मिळाले आहेत. तर, वाहनांच्या सुट्या भागांचा लिलावातून ३ कोटी ३० लाख रूपये मिळाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेचे उपायुक्त, व्हेईकल डेपोचे प्रमुख जयंत भोसेकर यांनी दिली.
 
महापालिकेच्या वाहन विभागाकडे सध्या एकूण १,१६३ वाहने आहेत. त्यामध्ये अधिकार्‍यांची वाहने, घनकचरा विभाग, पाणीपुरवठा, अग्निशमन दल यासह सर्व विभागांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार १५ पेक्षा जास्त वर्षांची वाहने रस्त्यावर आल्यास त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे धोरण आणले आहे. काही वाहने १५ वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादेची होती. गुलटेकडी येथील वाहन विभाग, कोंढवा आणि हडपसर येथे ठेवली होती. ही वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यानुसार  महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून ४७३ वाहने सेवेतून बंद केली. या वाहनांचा टप्प्याटप्याने झालेल्या लिलावातून महापालिकेला  सुमारे ६ कोटी ८५ लाख रूपये मिळाले आहेत.  तसेच, पुणे महापालिकेच्या वाहनांच्या सुट्या भागांचा लिलावही टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सुट्ट्या भागांमध्ये टायर, हायमास्टचे पोल, दवाखान्यात खाटा, पथ विभागाचे साहित्य यांचा समावेश आहे. सुट्ट्या साहित्यांच्या विक्रीसाठी १४४ लॉट पाडले असून  आत्तापर्यंत सुमारे १२८ लॉटचा लिलाव पुर्ण झाला आहे. यातून महापालिकेला अंदाजे ३ कोटी ३० लाख रूपये मिळाले आहेत.  १६ लॉटचा लिलाव लवकरच होणार आहे.

Related Articles