तहव्वूर राणा याचा ताबा भारताकडे   

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेने भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविले आहे. तहव्वूर याला घेऊन भारतीय अधिकार्‍यांचे पथक विशेष विमानाने मायदेशी येणार आहे. या पथकात सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. यातील तीन अधिकारी राष्ट्रीय तपास पथकातील आणि तीन अधिकारी गुप्तचर विभागातील आहेत.
 
तहव्वूर याने आपणास भारताकडे सोपाविले जाऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी, त्याने सर्व कायदेशीर पर्याय वापरले. मात्र, ते सर्व अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळून लावले. फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर याला भारताकडे सोपविणार येणार असल्याचे सांगितले होते. तहव्वूरला भारतात आणताच न्यायालयासमोर उभे केले जाईल. सुरूवातीला त्याचा ताबा एनआयएकडे राहील. त्यानंतर, त्याला मुंबई पोलिसांकडे सोपविले जाईल. याकाळात त्याला तिहार आणि मुंबईतील कारागृहात विशेष सुरक्षा व्यवस्थेत ठेवले जाईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. तहव्वूरमुळे २६/११ च्या हल्ल्यामागील पाकिस्तानी राजकर्त्यांची भूमिका उघडकीस आणण्यास मदत होईल. तसेच, तपासावर नव्याने प्रकाश पडू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. तहव्वूर याने १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान पत्नी समराज राणा अख्तरसह उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, दिल्ली, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबईला भेट दिली होती.

Related Articles