पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या   

दोन्ही बाजूने फेर्‍या; प्रवाशांना दिलासा 

पुणे : उन्हाळी सुटीत रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत असते. बर्‍याच वेळा गाड्यांना गर्दी झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होत असते. ही गैरसोय टाळ्यासाठी  पुणे ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर १४ वातानुकूलित विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी (गाडी क्र.०१४४१) ही गाडी १५ एप्रिल ते २७ मे पर्यंत दर मंगळवारी पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. दुसर्‍या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणार आहे. 
 
या दरम्यान ७ गाड्या धावणार आहेत. तर विशेष (गाडी क्र. ०१४४२) गाडी १६ एप्रिल ते २८ मेपर्यंत दर बुधवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटणार असून, दुसर्‍या दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुणे येथे पोहोचणार आहे. या दरम्यान ७ गाड्या धावणार आहेत. या गाडीला लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, कामण रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, नागदा जंक्शन, डकनिया तलाव, भवानी मंडी, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, मथुरा जंक्शन आणि पलवल आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.
 
पुण्यातून उत्तर भारतात रोज रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेषत: उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत या संख्येत भर पडत असते. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेवून पुणे-हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याने पुणे आणि परिसरातून उत्तर भारतात जाणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे ही गाडी संपूर्ण सु्टट्यांच्या कावधीत धावणार आहे. 
 
पुणे-नागपूर दरम्यान १४ गाड्या धावणार
 
पुणे-नागपूर दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष १४ गाड्या धावणार आहेत. १२ ते २४ मेपर्यंत दर शनिवारी पुणे येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. या गाडीच्या ७ फेर्‍या होतील. १३ ते २५ मेपर्यंत दर रविवारी नागपूर येथून दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी ही गाडी सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहचेल. या दरम्यान ७ गाड्या धावणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

Related Articles