तुळजाभवानी मंदिरात आरोपी पुजार्‍यांना बंदी   

अमली पदार्थ प्रकरण; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

सोलापूर, (प्रतिनिधी) : अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी १४ पुजार्‍यांवर तुळजाभवानी मंदिरात बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले. दरम्यान, आरोपींचा मंदिराशी संबंध नसल्याचे सांगत सरसकट पुजार्‍यांना बदनाम न करण्याची मागणी पुजारी मंडळाने केली आहे. १४ फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथून अमली पदार्थांसह तिघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर अमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. अमली पदार्थांचे धागेदोरे मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 
 
अमली पदार्थ प्रकरणातील आरोपींची संख्या ३५ वर गेली असून, यापैकी २१ आरोपी फरारी आहेत, तर १४ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, अमली पदार्थ प्रकरणात तब्बल १४ पुजार्‍यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मंदिर संस्थानने आरोपी पुजार्‍यांची पोलिसांकडून माहिती मागवली असून त्यानंतरच पुजार्‍यांवर मंदिर बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
? दोषी पुजार्‍यांचा मंदिरच्या धार्मिक पूजा विधीशी संबध नाही. विशेष म्हणजे अमली पदार्थ प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी पुजारी मंडळाने पुढाकार घेतला होता, तसेच आंदोलन केले होते. पालकमंत्र्यांनी लक्ष घालत कारवाईचे निर्देश दिले होते त्यामुळे अमली पदार्थ प्रकरणात पुजार्‍यांना बदनाम करण्याचे थांबवा. 

- विपीन शिंदे, उपाध्यक्ष, पुजारी मंडळ

दोन महिन्यांनंतरही २१ आरोपी फरारी 

अमली पदार्थ प्रकरणात दोन महिन्यांनंतरही २१ आरोपी फरारी आहेत. यामध्ये इंद्रजीतसिंग उर्फ मिंटू रणजितसिंह ठाकूर (नळदुर्ग), चंद्रकांत उर्फ बापू कणे, प्रसाद उर्फ गोटण कदम परमेश्वर, उदय शेटे, विनायक इंगळे, शाम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सोंजी, आकाश अमृतराव, दुर्गेश पवार, रणजीत पाटील, नाना खुराडे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, शरद जमदाडे, आबासाहेब पवार, आलोक शिंदे, अभिजीत गव्हाड, स्वराज उर्फ पिनू तेलंग (सर्व रा. तुळजापूर) व अर्जुन हजारे (रा. उपळाई खुर्द, सोलापूर) व संगीता गोळेचा पती वैभव गोळे आदींचा समावेश आहे.
 

Related Articles