वाळूचे अवैध उत्खनन-साठेबाजी करणारे दोघे निलंबित   

महसूलमंत्री बावनकुळे यांची कारवाई

मुंबई, (प्रतिनिधी) : भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणार्‍या दोन महसूल अधिकार्‍यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले आहे. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले अशी निलंबित अधिकार्‍यांची नावे आहेत.
 
नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती  उत्खनन रोखण्याबाबत व संबंधित आरोपीवर कारवाई होण्याबाबत तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातातील जखमींना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त होताच बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.

अधिकार्‍यांनी सतर्क रहावे

अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकार्‍यांनी सतर्क राहून  गंभीरपणे लक्ष द्यावे, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
 

Related Articles