कृष्णा कालव्यातून पाणी सोडले   

सातारा, सांगलीच्या चार तालुक्यांतील शेतीक्षेत्राला लाभ

सातारा : कर्‍हाडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने सोमवारपासून कालव्यात २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, या आवर्तनाचा कालावधी २५ दिवसांचा आहे. त्यामुळे चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला ऐन उन्हाळ्यात संजीवनी मिळणार आहे.
 
कर्‍हाड तालुक्यात खोडशी येथे कृष्णा नदीवरून कॅनॉलला प्रारंभ झाला आहे. हा कालवा सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील ३४ गावातून वाहत जाऊन येरळाला मिळतो. सुमारे ८६ किलोमीटर लांबीच्या या कॅनॉलवर शेती, पशुधन तसेच शेतकर्‍यांचे जीवन अवलंबून आहे. ३४ गावे व सुमारे १३ हजार ३६० हेक्टर शेतीक्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागिल महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सध्या कॅनॉलवर अवलंबून असणार्‍या शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता होती. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे तसेच पाणी नसल्यामुळे पिके होरपळत होती. त्यामुळे कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात होती.
 
पाटबंधारे विभागाने शेतकर्‍यांची मागणी आणि पिकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेता सोमवारपासून कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा कॅनॉलमध्ये विसर्ग केला जात असून, हे पाणी कर्‍हाडसह चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला संजीवनी देणारे ठरणार आहे. 
 

Related Articles