मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला मधमाश्यांनी घेरले   

मुंबई : अकासा एअरचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान नंबर A1 वर थांबले होते. याच दरम्यान अचानक मोठ्या संख्येने मधमाश्या जमा होऊ लागल्या. मधमाश्याना पाहून प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानतळावरील त्वरित प्रतिसाद दलाने घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दलाने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मधमाशांना विमानापासून दूर केले. या घटनेमुळे विमानाचे वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले. मधमाश्यांचा हल्ल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तपासणी केली. तपासणीनंतर विमानाला दिल्लीकडे प्रस्थान करण्याची परवानगी मिळाली. घटनास्थळी कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
 
विमानतळ प्रशासनाकडून गंभीर दखल
 
दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा मधमाशांचा थवा कसा आणि कुठून आला, याबद्दल चौकशी सुरू केली आहे. हवामान बदल, विमानांचा गोंगाट किंवा प्रकाशातील बदलांमुळे या अशा घटना घडू शकतात का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Articles