देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात   

लहान मोठे पक्षी - प्राणी जळून नष्ट

छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आणि जवळच असलेल्या खांदुर्णी परिसरात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागली. या आगीची व्याप्ती वाढून हळूहळू संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला. देवगिरी किल्ल्याच्या आवारात असणाऱ्या गवताला आणि झाडांना उन्हामुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, किल्ल्याच्या आतल्या भागात वाहन जाऊ शकत नसल्याने किल्ल्याच्या आतल्या भागात लागलेली आग हिरव्या झाडांच्या मदतीने नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात होते.
 
वाऱ्यामुळे ही आग दौलताबाद किल्ल्याच्या चारही बाजूंनी लागली. देवगिरी किल्ला तसेच जवळच असलेल्या खांदुर्णी परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली. ही आग पसरत गेल्याने किल्ल्याच्या चारही बाजूने आगीने विळखा घातला असल्याचे दिसत होते. या आगीत किल्ला परिसरात वास्तव्यास असलेले अनेक पक्षी - प्राणी तसेच जुन्या वास्तू जळून नष्ट झाल्याचे समोर आले. मात्र, अद्याप या आगीचे कारण कळू शकलेले नाही.
 
आगीची माहिती मिळताच भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु अग्निशमन दलाच्या वाहनांना किल्ल्यात प्रवेश करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. आधीच कडक उन्हामुळे किल्ल्यावरील गवत व झाडी वाळली आहेत. त्यात वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.
 
किल्ल्याला तीन तटबंद्या आहेत, या तिन्ही तट बंद्याच्या आतल्या बाजूने सर्वत्र आग लागली. या ठिकाणी असलेले गवत संपूर्णपणे जळत होते. किल्ल्यातील चाँदमिनारदेखील धूरांच्या लोटात गेल्याचे पाहायला मिळाले. किल्ल्याच्या वरील बाजूला असलेला महल देखील धुराच्या लोटात गायब झाला असल्याचे पाहायला मिळाले. किल्ल्यातील जुने अवशेष, लाकडी वास्तूंनादेखील आगीचा फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे. किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान मोठे पक्षी - प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदि प्राणी सैरावैरा पळताना दिसत होते.
 
दरवर्षी उन्हाळ्यात दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, वारंवार लागणाऱ्या आगीमुळे देवगिरी किल्ल्यावरील पुरातन वास्तूंना मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाने वेळेवर योग्य उपाययोजना न केल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
 

Related Articles