आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले   

थेऊर, (वार्ताहर) : एका महिलेने आपल्याच दोन लहान मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. तसेच, या महिलेने आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. ही घटना थेऊरमधील दत्तनगर काकडे वस्ती परिसरात घडली.प्रतिभा हेमंत कुमार मोहिते (वय-३५) असे तिचे नाव आहे. ही महिला माहेरी बाळंतपणासाठी आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. काल दहा ते अकराच्या दरम्यान प्रतिभा यांना पाण्याच्या टाकीर बुडताना त्यांच्या घरासमोरील पूजा स्वामी व त्यांचे पती शिवशंकर स्वामी यांनी पाहिले. स्वामी यांनी प्रतिभा यांचा भाऊ प्रल्हाद लक्ष्मण गोंडे यांना दुरध्वनीद्वारे कळवले. त्यानंतर प्रल्हाद यांनी घराच्या छतावर जाऊन प्रतिभा यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले.त्यानंतर, प्रल्हाद यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. 
 
मोहिते यांचा विवाह होऊन दहा वर्षे झाली होती. परंतु, त्यांना अपत्य होत नव्हते. त्यानंतर मूल होण्यासाठी त्यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन महिन्यांपूर्वी त्या बाळंतपणासाठी थेऊर येथे माहेरी आल्या. त्यांना जुळी मुले झाली. बाळांचे वजन कमी भरले. त्यामुळे मुले दगावतील, याची भीती त्यांना होती. तसेच, मलाच काही झाले तर मुलांकडे कोण पाहणार? यामुळे प्रतिभा यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जाते. पोलिस उपायुक्त अनुराधा उदामले यांनी घटनास्थळी भेट दिली.

Related Articles