शिर्डीत ४ भिक्षेकर्‍यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू   

अहिल्यानगर : रामनवमी उत्सवापूर्वी शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यांपैकी विसापूर कारागृहात दाखल केलेल्या १३ भिक्षेकर्‍यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारास अडथळा आणत असल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ भिक्षेकर्‍यांचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी मंगळवारी दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.मृत्युमुखी पडलेल्या भिक्षेकर्‍यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी ४ जणांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. तर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवालानंतरच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.अशोक मनसाराम बोरसे  (वय-३५), सारंगधर मधुकर वाघमारे (वय-४८), प्रवीण अण्णा घोरपडे (वय-४८), ईसार अब्दुल शेख (वय-३८) असे मृत भिक्षेकर्‍यांची नावे आहेत.
 
शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि भिक्षेकर्‍यांची वाढणारी संख्या याचा विचार करता उत्सवापूर्वी पोलिस प्रशासनाच्यावतीने भिक्षेकर्‍यांची धरपकड करण्यात आली होती. रामनवमी उत्सवापूर्वी ४९ जणांना ताब्यात घेऊन श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर कारागृहात  ठेवण्यात आले होते. त्यातील १० जणांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे सातही भिक्षेकरी व्यसनी असल्यामुळे डॉक्टरांकडून होणार्‍या उपचाराला यातील काहींनी नकार दिला.डॉक्टरांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही यावेळी घडल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी एकाचे निधन झाले तर मंगळवारी आणखी तिघांचे निधन झाले. असे चौघे रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले.
 
दरम्यान, शिर्डीतील भाविकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी विचारात घेऊन संस्थानच्यावतीने दिले जाणारे मोफत भोजन रद्द करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली होती. मोफत भोजन मिळत असल्याने भिक्षेकर्‍यांची येथे वर्दळ वाढली आहे आणि हा प्रकार गुन्हेगारी वाढीस पोषक असल्याचा संदर्भ देत विखे यांनी केलेल्या मागणीवर अनेक प्रकारची मत-मतांतरे प्रदर्शित झाली. परंतु, पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत पंचक्रोशीत भिक्षेकर्‍यांची वाढणारी संख्या विचारात घेता त्यांची धरपकड दोन टप्प्यांत केली. त्यातून भिक्षेकर्‍यांना सुधारण्याची संधी देण्याकरिता त्यांना विसापूर येथे ठेवण्यात आले होते. त्यातील १० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी जे आरोप केले आहेत त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, यातील सत्य शोधण्यासाठी डॉ. श्रीकांत पाठक यांच्या अध्यक्षतेखाली ४ जणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात पाठक यांच्यासह डॉ. शिवशंकर वलांडे, डॉ. दर्शना घोडे-बारवकर, लिपीक दत्तात्रय घाडगे यांचा समावेश आहे. ही समिती या प्रकरणाचा तपास करून ७ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यासंदर्भात शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरेल, असे सांगून अहवालातील निष्कर्षानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

Related Articles