बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल   

शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान

मंचर, (प्रतिनिधी) : टोमॅटो पिकाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून कमी झाला आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतर भाव पडले. भाव पडल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या टोमॅटोचा बाजारभाव अभावी लाल चिखल झाला आहे. भाव गडगडल्याने शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
 
मंचर व नारायणगाव बाजार समिती येथे ३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रति कॅरेटचा भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी जगायचे कसे, असा सवाल टोमॅटो उत्पादकांमधून उपस्थित केला जात आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पिंपळगाव, खडकी, चांडोली, भराडी, जवळे, निरगुडसर, पारगाव, काठापूर, लाखनगाव, कळंब,वडगाव काशिबेग परिसरातील अनेक शेतकरी टोमॅटो पीक घेतात. टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. पण, सध्या टोमॅटो पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून लाखो रुपये भांडवल घालून पोटच्या पोराप्रमाणे पिकलेली टोमॅटो शेती बाजारात कवडीमोल झाल्यामुळे शेवटी पिकाला विळा लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. सुरुवातीपासूनच टोमॅटोचे दर वाढत नसून कमी होत असल्याची परिस्थिती आहे. १ एकरला सरासरी दीड लाख रुपये खर्च येतो. खर्चाच्या तुलनेत कवडीमोलाची किंमत टोमॅटोला मिळत आहे. 
 
पिकांचे बाजार नसताना नुकसान झालेले असताना देखील काही शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पीक वाढवले. परंतु, त्याचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात आले  आहे. केलेला खर्चही निघत नसल्याची खंत अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो विकत असून तेथेही कमी भावात विक्री होत आहे. तसेच ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते. त्यावेळी देखिल टोमॅटो तोडणे, त्याला फुटवा होणे यासाठी देखील ओषधाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत न परवडणारा खर्च करून पिकवलेल्या टोमॅटो अत्यंत कमी दर मिळत आहे. यामुळे उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. टोमॅटोचे प्रतक्ष उत्पादन आणि उत्पन्न तसेच खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
 
मंचर बाजार समिती येथे ३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रतिकॅरेटचा भाव मिळत असल्याने मोठे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यात गाडी भाडेदेखील सुटत नाही. आजमितीला महिला मजुराला ३०० ते ३५० रुपये आणि पुरुषाला ४०० ते ५०० रुपये मजुरी द्यावी लागते.उत्पादन, खर्चाचा ताळमेळ बसत नाही.
 
रमेश खिल्लारी, टोमॅटो उत्पादक शेतकरी, भराडी.
 
कांदा, टोमॅटो, फ्लॉवर मिळणारा भाव त्या भावातून शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी अधोगतीला चालला आहे.फायद्याची तर बातच सोडा अशीच काहीशी परिस्थिती सर्व पिकाची झाली असून सरकारने पिक उत्पादनासाठी हमीभाव दिला पाहिजे. 
 
महेश ढमढेरे, शेतकरी पिंपळगाव घोडे आणि संचालक भैरवनाथ पतसंस्था मंचर.
 
काही टोमॅटो उत्पादक यांनी दर नसल्याने टोमॅटो शेताच्या बांधावर टाकून दिले आहे. मशागत, रोपे, फवारणी, आधार देण्यासाठी लागणार्‍या कारव्या व तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मंजूरी याचा खर्च खूप मोठा आहे. सरकारने बाजारभाव नसणार्‍या शेती पिकांसाठी पिकांसाठी अनुदान देण्याचा विचार केला पाहिजे.
 
निलेश थोरात, सभापती कृषी बाजार समिती मंचर.                   

Related Articles