कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'   

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा लोकांना गद्दार म्हणत आहे. मात्र, कामरा जेव्हाही मुंबईत येईल तेव्हा जशास तसे उत्तर दिले जाईल. त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच होईल, तसेच कुणाल कामरा मुंबईत आल्यानंतर त्याचे स्वागत करावेच लागेल. कारण तो एवढा मोठा व्यक्ती आहे, मोठा स्टार आहे. त्याचे स्वागत आम्ही जरूर करणार, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.
 
कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावले. मात्र, चौकशीसाठी कुणाल कामरा हजर झाला नाही. 
 
मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला १७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. दुसरीकडे कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून, पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी कुणाल कामराला मोठा इशाराही दिला आहे. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.

Related Articles