पोलिस कर्मचार्‍याच्या मोटारीला अपघात; चौघे ठार   

वर्धा : वर्धा तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात  वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी व दोन मुले यांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितले. 
 
वैद्य कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश (वय ६) व मुलगी माही (वय ३) हे देखील होते. महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून ते आपल्या मोटारीने वर्ध्याकडे परत निघाले होते. मांडगावजवळ त्यांची मोटार आली असताना रस्त्याच्या मधोमध एक रानडुक्कर त्यांच्या गाडीपुढे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या टँकरला त्यांची गाडी धडकली. यात घटनास्थळीच वैद्य यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य व त्यांच्या मुलीचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे व काकडे हे पोहचले. जखमींना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्य हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. 

Related Articles