लोकमान्य टिळक हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रेरणास्थान   

डॉ. न. म. जोशी यांचे प्रतिपादन 

पुणे : कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती या संकल्पनेचे प्रणेते लोकमान्य टिळक आहेत. राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक समाजाचा पाया रचला. त्यामुळे आताच्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रेरणा लोकमान्य टिळकच आहेत, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकमान्य टिळक अध्यासनाच्या वतीने लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘लोकमान्यांचा शिक्षण विचार’ या विषयावर ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी गुफंले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप शेठ, लोकमान्य टिळक विचार मंचाचे अध्यक्ष शैलेश टिळक उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले, देश स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये स्वाभिमान जागृत करणे आवश्यक होते. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून लोकमान्यांनी तरूणांत राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली. परंपरागत उद्योग व कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग निवडला. ब्रिटिशांकडून दिले जाणारे शिक्षण कारकून तयार करणारे होते. लोकमान्यांना शिक्षणातून स्वाभिमानी तरूण घडणे अपेक्षित होते. समाजाची सर्वार्थाने उन्नती करणारे शिक्षण हवे, असाही लोकमान्यांचा आग्रह असल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले. 
 
राष्ट्रीय शिक्षण का? हे सांगताना लोकमान्यांनी, आमचे राष्ट्रीय शिक्षण द्वेषमुक्त असून स्वाभिमान जागविणारे असेल. त्यात लष्करापासून स्त्री शिक्षणापर्यंतचा समावेश असेल. त्यात मूलभूत शिक्षणावर भर असेल, राष्ट्रीय शिक्षणातून सुधारित समाजाची पायाभरणी होईल, असे सांगितले होते. लोकमान्य हे उत्तम शिक्षक आणि गणित तज्ज्ञ होते. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक लेख ‘केसरी’तून लिहिले. स्त्री ही कुटुंबातील महत्त्वाचा घटक आहे, तर कुटुंब हे समाजाचा आणि समाज हा राष्ट्राचा घटक आहे. त्यामुळे स्त्रियांनी शिकले पाहिजे असे लोकमान्यांचे मत होते, याकडे लक्ष वेधून डॉ. जोशी म्हणाले, तरूणांना राष्ट्राच्या कल्याणासाठी शिकवा, असा उपदेशही त्यांनी केला होता. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले,स्वाभिमानी शिक्षण ही तेव्हाची गरज होती. भारतीय ज्ञानपरंपरेचा आताच्या शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात अलीकडच्या काळात खूप मोठा बदल झाला आहे. माणसे घडविण्याचे काम शिक्षण करते. माणसांत जनजागृती करणे, माणसाला सकारात्मक विचार करायला लावण्याची शिकवण लोकमान्यांनी दिली. डॉ. दिलीप शेठ यांनी प्रास्ताविक केले. निशिधा पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले. विनायक जोशी यांनी आभार मानले. 

Related Articles