चीनची आता आरपारची लढाई   

अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंगपुढे झुकणार नाही

बीजिंग :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी चीन आणि भारतासह जगातील १८० देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यानंतर जागतिक बाजारात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देत जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने प्रत्युत्तर शुल्कही जाहीर केले आहे. यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीवर ५० टक्के अतिरिक्त कर लादण्याची धमकी दिल्यानंतर चीनने मंगळवारी ’टॅरिफ’विरोधातील लढाई यापुढे आरपारची असेल, असा इशारा दिला आहे.
 
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे, की अमेरिकेने चीनवर लादलेले वाढीव शुल्क हे पूर्णपणे निराधार आणि एकतर्फी गुंडगिरीचा प्रकार आहे. यावर चीनने उचललेले पाऊल हे त्याचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि सामान्य आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्था राखण्यासाठी आहेत. ते पूर्णपणे वैध आहेत.
 
चीनवरील आयात करात वाढ केल्यानंतर अमेरिकेची धमकी ही चुकीनंतरची आणखी एक चूक आहे. पुन्हा एकदा अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग स्वभावाचा पर्दाफाश करते. चीन हे कधीही स्वीकारणार नाही. जर अमेरिकेने आम्हाला त्या मार्गावर जाण्यास भाग पाडले तर चीन शेवटपर्यंत लढेल, असे त्यात म्हटले आहे.अमेरिकेविरोधात चीनने कठोर भूमिका घेतली आहे. चीन कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
 
चीनने अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के कर लावण्याची घोषणाही केली. चीनच्या या कृतीवर ट्रम्प चांगलेच संतापले आहेत. जर बीजिंगने मंगळवारपर्यंत प्रत्युत्तरात्मक शुल्क उठवले नाही, तर या आठवड्यात चिनी आयातीवर ५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे, तसेच पुढील काळात चीनसोबतच्या सर्व बैठका देखील रद्द केल्या जातील.
 

Related Articles