नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार   

विश्रांतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून  नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला, तसेच विविध कारणे सांगून पीडितेकडून तब्बल २५ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कबीर अहमद खान ऊर्फ कबीर अरोरा (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. या दरम्यान आरोपी कबीर खान याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत पुणे, सांताक्रूझ, मुंबई, नेपाळ, थायलंड व अझर बैझान या ठिकाणी नेऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केला.
 
कबीर खान याने बँक खाते जास्त व्यवहारामुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिसा तयार करायचा आहे, यांसह विविध कारणे सांगून पीडित तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. कबीर घेतलेले पैसे परत देत नाही, तसेच लग्न करण्यासही टाळाटाळ करत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांत धाव घेत कबीर खान याच्याविरोधात मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Articles