हिंसाचार आणि धर्मवादामुळे देश द्वेषाच्या गर्तेत   

काँग्रेस कार्यकारिणी बैठक ; भाजप, संघावर काँग्रेसची टीका

अहमदाबाद : हिंसाचार आणि धर्मवाद देशाला द्वेषाच्या गर्तेत ढकलत आहे, असे सांगत काँग्रेसने मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. काँग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक येथे पार पडत आहे. या बैठकीत धार्मिक ध्रुवीकरणाच्याविरोधात लढा देण्याचा निर्धारही करण्यात आला. या बैठकीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आदी उपस्थित होते.
 
या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना के.सी. वेणुगोपाल यांनी, सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले.पंडित नेहरू आणि पटेल यांच्यात एक अनोखे नाते होते. तसेच, त्यांच्यात वैचारिक जुगलबंदीही होती, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले. सरदार पटेल आणि नेहरू यांच्यात मतभेद होते, असा दुष्प्रचार करण्यात आला. अर्थात, ही बाब सर्वस्वी खोटी आहे. वस्तुस्थिती बघता ही बाब एकप्रकारे स्वातंत्र्य लढा आणि गांधी-नेहरु-पटेल यांच्या एकत्रित नेतृत्वावर हल्ला आहे, असे ठरावात म्हटले आहे. झालेले आरोप सर्वस्वी खोटे आहे. कारण, ३ ऑगस्ट १९४७ रोजी सरदार पटेल यांनी पंडित नेहरु यांना पत्र लिहिले होते. त्यात म्हटले आहे की, आपले संबंध आणि मैत्री अतूट आहे. गेली ३० वर्षे त्यात कोणतीही औपचारिकता नाही. आपली आघाडी अतूट आणि ती आपल्या शक्तीत एकवटलेली आहे. या बैठकीत खर्गे यांनी पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्या मैत्रीबाबत सांगितले. नेहरु आणि पटेल एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या, असेही खर्गे यावेळी म्हणाले. यासोबतच, पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवरही भाष्य केले.      
 
पटेल यांच्याबद्दल नेहरुंना आदर होता. पटेल आणि संघाची विचारधारा भिन्न होती, त्यांनीच संघावर बंदीही घातली होती. परंतु, आज संघ परिवारवाले पटेल यांचे आम्हीच वाससदार असल्याचे सांगतात, अशी टीकाही खर्गे यांनी केली.  स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आणि १४० वर्षांपासून देशाची सेवा करणार्‍या काँग्रेसविरोधात वातावरण तयार केले जात आहे, असे सांगत खर्गे यांनी भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडले. पटेल यांचा वारसा आमच्या हृदयात आहे. त्यांचे विचार घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात आयोजित केली, असेही खर्गे म्हणाले. 

Related Articles