लखनऊचा अवघ्या ४ धावांनी विजय   

लखनऊ : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात मंगळवारी रंगलेल्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जाएंट्स संघाने अवघ्या ४ धावांनी विजय नोंदवला. उच्च धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने तगडी टक्कर दिली. अजिंक्य रहाणेच्या कडक अर्धशतकानंतर अखेरच्या षटकात रिंकू सिंहची फटकेबाजी पाहायला मिळाले. त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह १५ चेंडूत नाबाद ३८ धावा कुटल्या. पण तरीही कोलकाता संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 
 
रिंकू सिंहची लेट एन्ट्री झाली. त्यातही त्याने आपला तोरा दाखवला. पण कोलकाताचा पराभव तो टाळू शकला नाही. ३३८ धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाला निर्धारित २० षटकात ७ बळीच्या मोबदल्यात २३४ धावांपर्यंतच मजल मारता आली.लखनऊच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्करम ४७ (२८), मिचेल मार्श ८१ (४८) आणि निकोलस पूरन ८७ (३६) या तिघांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ३ बळींच्या मोबदल्या निर्धारित षटकात २३८ धावा केल्या होत्या. 
 
या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता संघाने क्विंटन डिकॉकच्या रुपात १५ (९) पहिला बळी ३७ धावांवरच गमावला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. सुनील नरेन १३ चेंडूत ३० धावांची स्फोटक खेळी करून माघारी फिरला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने ३५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. टी-२० कारकिर्दीतील त्याचे हे ५० वे अर्धशतक ठरले.  त्याच्या खेळीशिवाय उप कर्णधार व्यंकटेश अय्यरने २९ चेंडूत ४५ धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेणारी खेळी केली. अखेरच्या षटकात रिंकू सिंहने जोर लावला. त्याने १५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी केली. पण कोलकाताच्या संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या सामन्यातील तिसर्‍या विजयासह लखनऊच्या संघाने आपल्या खात्यात ६ गुण जमा केले असून गुणतालिकेत ते आता चौथ्या स्थानावर पोहचले आहेत. 
 
संक्षिप्त धावफलक
 
लखनऊ : मार्कराम ४७, मिचेल मार्श ८१, पुरन नाबाद ८७, अब्दुल समद ६, मिलर नाबाद ४, अवांतर १३, एकूण : २० षटकांत २३८/३
कोलकाता : रहाणे ६१, डीकॉक १५,सुनिल नार्ने ३०, अय्यर ४५, रिंकू सिंग ३८, राणा १० एकूण : २० षटकांत २३४/७

Related Articles