रजत पाटीदारने नाकारला सामनावीराचा पुरस्कार   

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना खेळवण्यात आला. या सामन्यात, आरसीबीने एमआयचा १२ धावांनी पराभव करून स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला. १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वानखेडे स्टेडियमवर आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळाला.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत खेळलेल्या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 
 
वानखेडे स्टेडियमवर १० वर्षांनी झालेल्या या विजयात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने ३२ चेंडूत ६४ धावा केल्या. या शानदार खेळीसाठी त्याला ’सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला, पण पुरस्कार स्वीकारताना रजत पाटीदारने सर्वांचे मन जिंकले आहे. जेव्हा कोणत्याही संघाचा कर्णधार त्याच्या खेळाडूंना स्वतःपेक्षा पुढे ठेवतो, तेव्हा त्या संघाचे वातावरण वेगळे असते. सध्या आरसीबीच्या कळपातही तेच दिसून येत आहे. आता पहा, रजत पाटीदारने ६४ धावांची स्फोटक खेळी केली, पण जेव्हा त्याला ’सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की तो खरा पात्र नाही. सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला, हा खरोखरच एक हाय व्होल्टेज सामना होता. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने धाडस दाखवले ते अद्भुत होते. खरे सांगायचे तर, हा पुरस्कार गोलंदाजी युनिटला जातो कारण या मैदानावर फलंदाजांना रोखणे सोपे नाही, त्यामुळे त्याचे श्रेय त्यांना जाते. 
 
वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या योजना ज्या पद्धतीने राबवल्या ते उत्तम होत्या. कृणालने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती अद्भुत होती. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात, कृणाल पांड्या त्याच्या ३ षटकांमध्ये खूप महागडा ठरला, पण आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला शेवटचे षटक दिले. कृणालने शेवटच्या षटकात ३ विकेट्स घेतल्या आणि त्याच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर रजत पाटीदार म्हणाले की, आम्हाला सामना थोडा खोलवर घेऊन जायचा होता. त्यामुळे भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांना १८ व्या आणि १९ व्या षटकांची जबाबदारी देण्यात आली आणि कृणालला शेवटचे षटक टाकण्यासाठी दिले.

Related Articles