पुणे : शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वरूणराजा अधिक प्रमाणात बरसणार आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. या अंदाजात ५ टक्क्यांनी वाढ किंवा घट होऊ शकते, असेही अंदाजात नमूद केले आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडेल. जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात १६५.३ मिलीमीटर पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात २८०.५ मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात २५४.९ मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पावसाची नोंद होऊ शकते. तर,१६७.९ मिलीमीटर पावसाची नोंद होईल. भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसर्या श्रेणीत ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसर्या श्रेणीत ९६ ते १०४ टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०५ ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.
Fans
Followers