तपमानाचा पारा चाळीशीपार   

पुणे : राज्यात सलग तिसर्‍या दिवशीही विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तपमानाचा पारा चाळीशीपार गेला. कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांची वाढ झाली. राज्यात सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस इतके तपमान अकोला येथे नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसांत तपमानात मोठा बदल होणार नसून त्यानंतरच्या चार दिवसांत तपमानात २ ते ४ अंशाची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरातही मंगळवारी लोहगाव येथे सर्वाधिक ४२.७ अंश तपमान नोंद झाली.
 
उत्तर भारतात राजस्तान, पंजाब, हरयाना राज्यात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे राज्याच्या दिशेने उष्ण वारे वाहत आहेत. या उष्ण वार्‍यांमुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत तपमान चाळीस अंशाच्या पुढे गेले आले. जळगाव येथे तपमाना ४३.३ अंश सेल्सिअस इतके होते. तर किमान तपमानातही सुमारे १ ते ४ अंशांची वाढ झाल्याने रात्री उकाडा जाणवत आहे.राज्यात अहिल्यानगर येथे निचांकी १९.६ अंश सेल्सिअस तपमानाची झाली. कमाल तपमान वाढल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरात रस्त्यांवरील वाहतूक तुलनेने कमी झाली आहे. पुणे शहरातही काल सर्वाधिक तपमान लोहगाव येथे ४२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. कोरेगाव पार्क येथे ४१.४ आणि शिवाजीनगर येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
 
वार्‍याची द्रोणीय रेषा पश्चिम राजस्तानमधून पश्चिम विदभापर्यंत जात आहे. कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात वार्‍याच्या वरच्या थरात एक चक्रकार स्थिती आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात किचिंत वाढ झाली. 
 

Related Articles