अनर्थाला निमंत्रण (अग्रलेख)   

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे १४ लाख कोटी रुपये स्वाहा झाले. भारताच्या एकूण निर्यातीपैकी १८ टक्के निर्यात अमेरिकेला होते. तरीही व्यापार युद्धाचा फटका भारताला बसणार, हे स्पष्ट झाले.
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने अनर्थाला निमंत्रण मिळाले, हे आतापर्यंत पुरेसे सिद्ध झाले. सत्तेवर येऊन फार काळ उलटला नसताना त्यांनी निर्माण केलेला गोंधळ पाहता पुढच्या काळात काय घडू शकते याची कल्पना करता येईल! जागतिकीकरणाच्या व्यवस्थेला, खुल्या आर्थिक धोरणालाच ट्रम्प हादरा देऊ पाहात आहेत. जागतिक व्यापार संघटनेने बसवलेली घडी ते विस्कटत आहेत. त्यांनी ‘प्रत्युत्तर शुल्का’च्या नावाखाली अमेरिकेत आयात होणार्‍या उत्पादनांवर प्रचंड कर लावले. प्रत्येक देशानुसार त्यांनी स्वतंत्र कर ठरविले. परिणामी जगभरातील शेअर बाजारांनी गटांगळी खाल्ली. अमेरिकेतील शेअर बाजारातही घसरण झाली. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भूकंप आला. ‘अमेरिका प्रथम’ ही ट्रम्प यांची भूमिका किती फोल आहे, हे जगाने पाहिले; पण स्वतःला अर्थतज्ज्ञ मानू लागलेले ट्रम्प वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाहीत. ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा इलॉन मस्क हे ट्रम्प यांचे सल्लागार. ट्रम्प यांच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडणार, रोजगार कमी होणार हे अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या लक्षात आले आणि तेथे जनक्षोभ उसळला. टेस्लाच्या मोटारी, टेस्लाचे शोरुम हे संतप्त निदर्शकांचे लक्ष्य ठरले. अमेरिकेतील डाऊ फ्यूचर्ससह एस अँड पी ५००, नॅसडॅक फ्यूचर्स हे निर्देशांक घसरले. हँगसँग हा हाँगकाँगचा निर्देशांक तब्बल १३ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेत अ‍ॅपल, टेस्ला या ‘ब्लू चिप’ मानल्या जाणार्‍या कंपन्यांचे बाजारमूल्य घसरणीला लागले आहे.

उफराटा न्याय

आता  मस्क आणि ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार पिटर नॅवॅरो यांच्यात वादाची ठिणगी पडली. ते घडणार होतेच. भारतीय शेअर बाजारात देखील ‘ब्लॅक मंडे’ने धूळधाण उडवली. पोलाद, पायाभूत सुविधा उभ्या करणार्‍या कंपन्या, सिमेंट, अभियांत्रिकी यांसह प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मानल्या जाणार्‍या इन्फोसिस आणि विप्रो यांच्या बाजारभावातील घसरण हजारो गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आणणारी होती. सुदैवाने काल शेअर बाजार सावरला असला तरी ट्रम्प यांच्या लहरीपणामुळे जग मंदीच्या दिशेने जाण्याचा धोका कायम आहे. आतापर्यंत अमेरिकेचा गैरफायदा सर्व देशांनी घेतला, हे ट्रम्प यांचे म्हणणेच मुळात हास्यास्पद. आपल्या आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या बळावर अमेरिकेने अनेक दशके जगातील बर्‍याच देशांची धूळधाण केली. ट्रम्प यांना अमेरिकेतील उत्पादनांना चालना द्यायची आहे; पण उत्पादनासाठी केंद्र आहेत तरी कुठे? तयार उत्पादने स्वस्तात मिळविण्यासाठी याच अमेरिकेने चीनसह अनेक देशांना प्रोत्साहन दिले. आता तेथून येणार्‍या उत्पादनांवर मोठा कर आकारणे, हा उफराटा न्याय झाला; मात्र राष्ट्रवादाच्या नावाखाली ट्रम्प खोटा युक्तिवाद खपवू पाहात आहेत. ट्रम्प अध्यक्ष झाल्याने भारतात अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ट्रम्प यांचे अनर्थकारी निर्णय त्यांची वाचा बसवणार आहेत. अमेरिका आणि रशिया या दोन महाशक्तींमध्ये जगाची विभागणी झाली होती. रशियाचा प्रभाव ओसरत गेल्यावर चीन महाशक्ती बनला तरी; अमेरिका आणि चीन यामध्ये जगाची विभागणी झाली नव्हती. ती संधी खुद्द ट्रम्प यांनीच  मिळवून दिली आहे. ‘ट्रम्प यांच्या ब्लॅक मेलिंग’ला बळी पडणार नाही, शेवटपर्यंत लढत राहणार’ या शब्दांमध्ये चीनने त्यांना सुनावले. यातून ट्रम्प यांचा आणखी तिळपापड झाला आहे. आयात कर वाढविण्याचा निर्णय ट्रम्प काही काळासाठी स्थगित करतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. ते होण्याची चिन्हे कमी आहेत. अनिश्चितता परवडणारी नसल्याने आता कॅनडा, मेक्सिकोबरोबरच युरोपियन समुदायदेखील आक्रमक होताना दिसत आहे. आयात करातील वाढीमुळे अमेरिकेत येणार्‍या उत्पादनांच्या किमती वाढून मागणीत मोठी घट होणार आहे. महागाई तात्पुरती राहील, असे सांगत ट्रम्प यांनी हटवादीपणा कायम ठेवला आहे. त्यांनी केवळ अमेरिकेलाच नव्हे तर जगाला अडचणीत आणले. अन्य देशांच्या तुलनेत चीनवर सर्वाधिक कर लादल्याने भारताला संधी आहे, असे मानणारा एक वर्ग आहे; पण भारतावर लादलेल्या २६ टक्के कराचे काय? व्यापारयुद्ध सुरु करणार्‍या अमेरिकेला जशास तशा उत्तरासाठी जगाने एकत्र येणे, हाच मार्ग आहे. 
 

Related Articles