मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्‍यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार   

जयपूर : राजस्तानच्या जयपूरमध्ये सोमवारी रात्री मद्यधुंद काँग्रेस नेत्याने भरधाव वेगात मोटार चालवत पादचार्‍यांसह नऊ जणांना चिरडले. या अपघातात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. काँग्रेस नेते उस्मान खान यांनी मद्यधुंद अवस्थेत शहरातील गजबजलेल्या भागात वेगाने मोटार चालवली, त्यामुळे गोंधळ उडाला. 

उस्मान खान गेल्या २० वर्षांपासून व्यवसायासोबतच जयपूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे. उस्मान खान वॉर्ड १३५ मधून नगरसेवकपदासाठी काँग्रेसकडून तिकीट मागत होते. उस्मान खान विश्वकर्मा इंडस्ट्रियल एरियामध्ये डक्वेट इलेक्ट्रो मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत सीईओ आहेत. त्यांची कंपनी रुग्णालयातील बेड, खुर्च्या, रुग्णवाहिका स्ट्रेचर आदी बनवते. उस्मान खान यांची नुकतीच जयपूर शहर काँग्रेसमध्ये सहाव्यांदा नियुक्ती करण्यात आली. मात्र, या घटनेनंतर जयपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने उस्मान खान यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 

कठोर शिक्षा झाली पाहिजे : तिवारी

या प्रकरणाबाबत जयपूर काँग्रेसचे अध्यक्ष आरआर तिवारी म्हणाले, गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असू शकतो. उस्मान खान यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कठोर शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये कोणताही राजकीय पक्षपात करू नये.  तसेच आपण मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचेही तिवारी यांनी यावेळी सांगितले.
 

Related Articles