गाझा पट्टीच्या ५० टक्के भागावर इस्रायलचा कब्जा   

तेल अविव : गाझा पट्टीतील ५० टक्के भागावर इस्रायलने कब्जा करण्याचे ठरविले आहे. युद्धात नुकसान झालेल्या मालमत्तांचे अवशेष काढून टाकून तेथे तो भाग इस्रायलला जोडून तो एक संरक्षित भाग करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्या दिशेने आता पावले टाकण्यास सुरुवात केली जात आहे. 
 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमास दहशतवाद्यांनी इस्रायलवर  शेकडो रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्रायलने गाझात जोरदार आक्रमक कारवाई केली. परिसर ताब्यात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली होती. त्या अंतर्गत आक्रमक हवाई हल्ले केले होते. त्यात गाझा पट्टीची प्रचंड नासधूस झाली. इस्रायली सैन्याने तेथील ५० टक्के भूभागावर संपूर्ण कब्जा करण्याचे ठरवले असून नासधूस झालेल्या भागाचे सपाटीकरण केले जाणार आहे. संपूर्ण भाग संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचे ठरवले आहे. त्या माध्यमातून या भागातून दहशतवाद्यांना थेट इस्रायलवर हल्ले भविष्यात करता येणार नाहीत. हमासने अनेक इस्रायली नागरिकांचे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अपहरण केले होते. त्यानंतर युद्धबंदी काळात काही जणांची सुटका केली नाही. उर्वरित ओलिसांची सुटका करण्यास वेळकाढूपणा केला. त्यामुळे संतापलेल्या इस्रायलने पुन्हा आक्रमक कारवाई केली आहे. हवाई हल्ले अजूनही सुरूच आहेत. आता गाझा पट्टीचा ५० टक्के भागावर संपूर्ण कब्जा मिळविण्याचे दिशेने पावले टाकली आहेत.

हवाई हल्ल्यात ५४ ठार, १३७ जखमी

गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ५४ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू तर १३७ हून अधिक जखमी झाले आहेत. सोमवारी पुन्हा हवाई हल्ला केला आहे. हॉस्पिटल परिसरात गेल्या २४ तासांत झालेल्या हल्ल्यात ५४ जण ठार झाले असून १३७ हून अधिक जण जखमी झाले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  दरम्यान, गेल्या अठरा महिन्यांत ५० हजार ७५२ नागरिक ठार झाले असून १ लाख १४ हजार ४७५ जखमी झाले आहेत. इस्रायलचे लष्कराकडून हल्ले केले जाताना दहशतवादी आणि नागरिक असा कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. इस्रायलने दावा केला की, आतापर्यंत २० हजार दहशतवाद्यांना ठार केले आहे. मात्र, त्याबाबतचे पुरावे दिलेेले नाहीत. 
 

Related Articles