पोलिसांवर गुन्हा दाखल करा   

एसआयटी स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

अक्षय शिंदे चकमक प्रकरण 

मुंबई : बदलापूर येथील अक्षय शिंदे चकमक प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. अशा कृतीमुळे सामान्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.
 
प्रथमदर्शनी हा गुन्हा उघड होत आहे, असे सांगतानाच खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीस होता. 
 
बदलापूरमध्ये एका शाळेत तीन मुलींवर अत्याचार झाला होता. या प्रकरणात शिंदे यास अटक झाली होती. शिंदे याला २३ सप्टेंबर २०२४ रोजी तळोजा कारागृहातून कल्याणला अन्य एका प्रकरणात चौकशीसाठी नेले जात असताना त्याने पोलिस अधिकार्‍याकडील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, शिंदे मारला गेला, असे पोलिसांनी म्हटले होते. शिंदे याच्या वडिलांनी पोलिसांवर बनावट चकमकीचा आरोप केला होता. तसेच, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईचे गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन केले जाणार आहे.

Related Articles