फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या   

चंद्रपुरात पक्षाकडून दोन कार्यक्रम

मुंबई : भाजपची काँग्रेस करु नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी भाजपच्या चंद्रपूर शाखेला फटकारले आहे. पक्षाच्या स्थापना दिनाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम घेणार्‍या दोन नेत्यांचे कानही उपटले आहेत चंद्रपूर येथे भाजपच्या स्थापना दिनाचा सोहळा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्रपणे आयोजित केला होता त्यावर तिखट प्रतिक्रिया शोभा फडणवीस यांनी व्यक्त केली. वास्तविक स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने अधिकृत कार्यक्रम आयोजित केला होता. 
 
त्या म्हणाल्या. एकीकडे नागरिक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लावत आहेत. दुसरीकडे तुम्ही एकमेकांशी भांडत आहात. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीच फरक उरला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. भाजपची जणू काही काँग्रेस झाली आहे का ? भाजप काँग्रेसप्रमाणे होता कामा नये, याकडे लक्ष दिले पाहिजे भाजपने स्वत:ची वेगळी ओळख कायम जपली पाहिजे, असे त्यांनी मुनगंटीवार यांचे नाव न घेता सांगितले. 
 
केंद्रात आणि राज्यात भाजपची राजवट आहे. दुसरीकडे मात्र चंद्रपूरमध्ये भाजप अंतर्गत मारामार्‍या सुरू आहेत, असे सांगताना त्या म्हणाल्या, संघटना एकच असताना दोन स्वतंत्र कार्यक्रम का घेतले ? त्यातून समाजात चुकीचा संदेश गेला. खरे तर चंद्रपूरचे आमदार जोरगेवार आहेत. त्यामुळे त्यांचे कर्तव्य होते की, एकच कार्यक्रम व्हावा, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे होता आणि अन्य जणांनी त्यात खुल्या मनाने सहभागी व्हायला हवे होते. आपल्यासमोर अनेक गंभीर विषय आहेत. त्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील प्रश्नांचा समावेश आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन आपणच भांडत बसलो तर ते चुकीचे ठरणार नाही का ? नेत्यांनी खोट्या अभिमानासाठी रडत बसू नये, पक्षाच्या कार्यकर्त्याचे आभार माना, असा सल्ला त्यांनी दिला.
 

Related Articles