धरणाच्या पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू   

भोर, (वार्ताहर) : मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा दम लागल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वेल्हे तालुक्यातील आंबेगाव हद्दीत मावळ अ‍ॅडव्हेंचरजवळ पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 
 
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मोहनीश विजय बोलटे (वय ३७, सध्या रा. येरवडा, पुणे मुळ रा.कोकण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार पंकज मोघे यांनी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनीश सुट्टी असल्यामुळे भाऊ शुभम व इतर  मित्रांसमवेत धरण परिसरात फिरावयास गेला होता. धरणाच्या काठावर मित्र गप्पा मारत बसले. मोहनीश एका मित्रासोबत पोहण्यास गेला. दरम्यान परत बाहेर येताना मोहनीशला दम लागला आणि नंतर तो दिसेनासा झाल्यावर काठावरील मित्रांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. शुभमने पोलिसांना फोन केला.पोलिसांनी वेल्ह्याचे हवालदार मोघे, अविनाश पाटील यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी आले. शोधमोहीम सुरू केल्यानंतर दोन तासाने मोहनीश बचाव पथकाच्या हाती लागला. वेल्हे ग्रामीण रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related Articles