तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका   

खासगी रुग्णालयांना महापालिकेची नोटीस

पुणे : तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांकडून अथवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रकमेची मागणी करु नये. रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करावेत, अशी नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना पाठवली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
 
तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांकडून उपचाराचे पैसे भरण्याची सक्ती खासगी रुग्णालयांकडून केली जाते. मात्र, अनेक वेळा लागलीच पैसे नसल्याने रुग्णांना उपचार घेण्यासाठी उशीर होतो. यात रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. असेच प्रकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडून नये, म्हणून महापालिकेने शहरातील ८६० खासगी रुग्णालयांना  नोटीस पाठवली आहे.
 
दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून मंगेशकर रुग्णालयाने तनिशा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारले होते. उशिरा उपचार मिळाल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला. मात्र, पैशांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाच्या विरोधात वातावरण पेटले आहे. राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संघटना, संस्था तसेच पुणेकरांकडून रुग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अनामत रक्कम न आकारण्याची नोटीस दिल्यामुळे तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 
रुग्णालयांकडून अनामत रक्कम भरण्यास सांगून रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येतो, उपचारासाठी वेळ लागल्यामुळे जीव गमविण्याची वेळ येते. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांना उपचार सुरु करण्यासाठी पैसे भरण्याची सक्ती करु नये, तातडीने उपचार करावेत, असे महापालिकेने पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे. दि बॉम्बे हॉस्पिटल होम अ‍ॅक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार पालन करणे आवश्यक आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पीटल्स, नर्सिंग होम्स, रुग्णालये यांना दि बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ मधील तरतुदींनुसार रजिस्ट्रेशन देण्यात येते. विहित मुदतीनंतर दिलेल्या रजिस्ट्रेशनचे नुतनीकरण करुन देण्यात येते. दि बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसुचना १४ जानेवारी २०२१ मधील तरतुदींनुसार हॉस्पिटल प्रशासनाने सर्व रुग्णांसोबत सौजन्य पूर्ण व्यवहार करणे अपेक्षित आहे. कायद्यातील सर्व सुचनांचे पालन करणे रुग्णालयांवर बंधनकारक आहे. विशेष करुन महाराष्ट्र शासन अधिसूचना १४ जानेवारी २०२१ मधील नियम ११ (जे) मधील अनु क्रं १ ते ३ चे पालन करताना आणीबाणीच्या वेळेत रुग्णांस सेवा देताना अनामत रक्कम घेऊ नये. महाराष्ट्र शासन अधिसूचनेत नमूद केले प्रमाणे सर्व शुश्रुषागृहे रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मुलभुत जीवित रक्षणाच्या सेवा देईल व जीवित रक्षणासाठीचे सुवर्णकालिन उपचार पध्दतीचे, निकषाचे पालन केले जाईल, अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

या टोल फ्री क्रमांकावर करा संपर्क

रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची मागणी व वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

८९ रुग्णालयांवर कारवाई

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील ८६०रुग्णालयांची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. या तपासणीस दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेदरम्यान ८९ रुग्णालयांमध्ये दोष आढळून आल्याने या प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. पुणे शहरात काही ठिकाणी कोणतीही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली होती. तसेच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ लाटण्यासाठी बनावट रुग्णांची नावे दिल्याची माहिती समोर आली होती.
 

Related Articles