पुण्यात तपमानाचा पारा वाढला   

लोहगावात ४२.२, शिवाजीनगरमध्ये ४०.२ अंशाची नोंद 

पुणे : हवामानातील बदलामुळे सोमवारी पुणे आणि परिसरात या हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद झाली. त्यामुळे मागील आठवडाभर ढगाळ वातावरण आणि पावसाची अनुभूती घेतलेल्या पुणेकरांना सोमवारी कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागला. लोहगाव परिसरात ४२.२ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. 
 
शहर आणि परिसरात मागील आठवडाभर ढगाळ वातावरण होते. दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या, तर दोन दिवस हलक्या पावसाने हजेरी लावली होती. कमाल आणि किमान तपमानात घट झाल्याने हवेत गारवा पसरला होता. मात्र काल अचानक कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे दुपारी तीव्र उन्हाच्या झळा जाणवत होत्या. आठवडाभरानंतर वाढलेल्या उन्हामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. सायंकाळी मात्र पुन्हा आकाश ढगाळ झाले होते. त्यामुळे उष्ण व दमट वातावरण झाले होते. परिणामी रात्री उकाड्यात वाढ झाली. 
 
आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवारी) पुणे व परिसरात कमाल आणि किमान तपमानात एक अंशाने वाढ होणार आहे. त्यानंतर पुन्हा एक अंशाने घट होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर आकाश मुख्यत: नीरभ्र असणार आहे. पुढील आठवड्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तपमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. आज (मंगळवारी) दुपारी ऊन कायम असणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाढलेल्या उन्हापासून पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार आहे. 
 
दरम्यान, कोकण, गोवा व विदर्भात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे असणार आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवारी) हवामान उष्ण व दमट असणार आहे. येत्या दोन दिवसात कमाल तपमानात १ ते २ अंशाने वाढ होणार आहे. त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी तपमानात घट होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
विदर्भात पुढील चार दिवस कमाल व किमान तपमानात २ ते ३ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कोणताही मोठा बदल होणार नाही. पुढील पाच दिवस राज्यात हवामान उष्ण व दमट हवामान असणार आहे. विदर्भात दोन दिवसांत उष्ण हवेची लाट येणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
ठिकाण कमाल किमान
लोहगाव ४२.२ अंश २३.७ अंश
पाषाण ४०.७ अंश १९ अंश
शिवाजीनगर ४०.२ अंश १८.५ अंश
मगरपट्टा ३९.६ अंश २५.१ अंश
एनडीए ३९ अंश १८.५ अंश
 

Related Articles