...तर पीएमपीच्या चालक-वाहकांवर होणार कारवाई   

पुणे : सिग्नल तोडणे, बस चालवताना मोबाइलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, यांसह अन्य वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणार्‍या पीएमपीच्या चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
 
वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार्‍या सूचना पीएमपी प्रशासन व खासगी ठेकेदाराच्या बसवरील चालक, वाहकांना यापुर्वी पीएमपीने दिल्या आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यासह पीएमआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत पीएमपी मार्फत बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पीएमपी व खासगी ठेकेदाराच्या बसवरील चालक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी व सूचना प्राप्त होत आहेत. 
 
तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाइलवर बोलत बस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे, रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे आदी तक्रारीचा समावेश आहे. यामु़ळे पीएमपी प्रशासन आता चांगलेच संतापले असून, त्यांनी वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करण्याचे कडक पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी काढले आहेत.
 
याबाबत गव्हाणे म्हणाले, पीएमपी चालक-वाहकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. त्या तक्रारी कमी करून प्रवाशांना चांगली सेवा पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या चालक-वाहक सेवकांवर कारवाई करणार आहे. ही कारवाई प्राप्त तक्रारीच्या स्वरूपानुसार केली जाणार असून, तक्रार जास्त गंभीर असेल, तर निलंबनाची देखील कारवाई केली जाणार आहे.
 

Related Articles