खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्‍यांचे टोचले कान   

शहराध्यक्षांकडून आंदोलनाचे समर्थन 

पुणे : सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी कायदा हातात घेऊ नये, वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, अशा शब्दात भाजपच्या राज्यसभा सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांचे कान टोचले आहेत. दुसरीकडे पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आंदोलनाचे समर्थन करत  कुलकर्णी यांनी जाहीरपणे महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर टिका केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले. यानंतर शहरातील विविध संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केली. तसेच भाजपच्या महिला मोर्चाने रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोड केली.
 
यावरून प्रा. कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून महिला मोर्चाचे कान टोचले आहेत. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचा त्या घटनेशी काहीही संबंध नसताना त्यांच्या क्लिनिकची तोडफोड करण्याचे केलेले उर्मट कृत्य, अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही येत आहेत.
 
दिल्लीतून परत आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली. पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे एखाद्या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्र माझ्यापर्यंत आलेले नाही

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जी दुर्घटना घटना घडली, त्यानंतर जी प्रतिक्रिया आली ती स्वाभाविक होती. एका महिले संदर्भात ही घटना घडली असल्याने महिलांचे नेतृत्व करणार्‍या पक्षाच्या महिला मोर्चाच्या हर्षदा फरांदे आणि त्यांच्या टीमने केलेल्या आंदोलन स्वाभाविक होते. त्यात काही चुकीचे होते, असे मला वाटत नाही. प्रा.  कुलकर्णी  यांचे कोणतेही पत्र माझ्यापर्यंत आलेले नाही. ते मी वाचलेले नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली. त्यामुळे जे पत्र मला मिळाले नाही, जे पत्र मी वाचले नाही, त्याबाबत अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.’ मात्र, आमच्या पक्षाची एक चौकट आहे. पुण्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करणारी चार जणांची टीम आहे. खासदार, आमदार, मंत्री अशी सर्वच लोक पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्रित बसून आपले काही मत असेल तर ते बैठकीमध्ये मांडले पाहिजे. असे माध्यमांमध्ये एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आणि त्याची चर्चा होणे, हे योग्य नाही.
 

Related Articles