पाकिस्तानला आयसीसीने ठोठावला लाखोंचा दंड   

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. मालिकेतील तिसर्‍या सामन्यातही पाकिस्तान संघाने स्लो ओव्हर रेट कायम ठेवला. याआधी खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये संघाने स्लो ओव्हर रेट कायम ठेवला होता. यामुळे आयसीसीने पुन्हा एकदा पाकिस्तान संघावर दंड ठोठावला आहे. कॅप्टन मोहम्मद रिझवानने ही शिक्षा स्वीकारली आहे.
 
पाकिस्तान संघाला तिन्ही सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला आणि आता सर्व संघ सदस्यांच्या सामन्याच्या मानधनातून पाच टक्के रक्कम कापण्यात आली आहे. आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी जेफ क्रो यांनी हा दंड ठोठावला आहे. निर्धारित वेळेची मर्यादा लक्षात घेऊन पाकिस्तान संघ त्यांच्या लक्ष्यापेक्षा एक षटक मागे होता. पहिल्या दोन सामन्यांमध्येही पाकिस्तान संघाची हीच अवस्था होती.आयसीसीच्या खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचार्‍यांसाठीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, जे किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, खेळाडूंना दिलेल्या वेळेत टाकण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामना शुल्काच्या पाच टक्के दंड आकारला जातो. गेल्या दोन सामन्यांमध्येही खेळाडूंना हाच दंड ठोठावण्यात आला आहे.
 
मैदानावरील पंच ख्रिस ब्राउन आणि पॉल रीफेल, तिसरे पंच मायकेल गॉफ आणि चौथे पंच वेन नाईट्स यांनी हे आरोप लावले. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने गुन्हा कबूल केला आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तान संघात चार वेगवान गोलंदाज होते. चार वेगवान गोलंदाजांसह ५० षटके टाकणे कधीकधी खूप कठीण होते. ही मालिका न्यूझीलंडने ३-० ने जिंकली आणि पाच सामन्यांची टी२० मालिकाही यजमान संघाने ४-१ च्या फरकाने जिंकली.

Related Articles