स्वच्छ पाण्यासाठी विकास आराखडा तयार करा : सुप्रिया सुळे   

पुणे: खडकवासला धरणाच्या परिसरातील आस्थापनांमुळे धरणातील पाणी दूषित होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासंदर्भात महापालिकेकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. म्हणूनच पालकमंत्री व महापालिका आयुक्ता यांनी पुणे महापालिका, पुणे नवनगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व पुणे जिल्हा परिषद यांच्यामार्फत खडकवासला धरणासह जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा  (डीपीआर) तत्काळ तयार करावा, हा आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यापुढे मांडू’ असे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितले.
 
खासदार सुळे यांनी सोमवारी विविध विकास कामे, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विषयांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन, महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके, काका चव्हाण यांच्यासह समाविष्ट गावातील नागरिक उपस्थित होते. लष्करी संस्था, रिसॉर्ट, हॉटेल्स, गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट धरणामध्ये येऊनही महापालिका ठोस कारवाई करत नसल्याबद्दल दोडके, चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गावांमधील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेजच्या किरकोळ कामांसाठीही निधीची कमतरता असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
 
मेट्रो व समाविष्ट गावांच्या प्रश्नांबाबत सुळे म्हणाल्या, मेट्रो सेवा ही घरापासून ते कार्यालयापर्यंत ये-जा करण्यासाठी सोईस्कर ठरली पाहिजे, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे पाच हजार बस तत्काळ खरेदी कराव्यात. मेट्रो यशस्वी होण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे. समाविष्ट गावांच्या मिळकत कराचा विषय गंभीर आहे. राज्य सरकारने निवडणुकीवेळी त्यावर स्थगिती दिली होती. आता मात्र सरकार ३४ गावांच्या मिळकत कराबाबत काहीच बोलत नाही. त्याबाबत सरकारने अचानक काही निर्णय घेतल्यास सामान्यांना फटका बसेल. 
 

Related Articles