वाचक लिहितात   

अमेरिकेत ट्रम्प विरोधात असंतोष
 
ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. त्यामुळे अमेरिकेत जनभावना उसळून आल्या आहेत. हॅन्डस ऑफ या आंदोलनातून हजारो नागरिकांनी अनेक ठिकाणी निदर्शने करत अनेक धोरणांना विरोध केला आहे. अमेरिकेत अशा सुमारे १२०० ठिकाणी ही निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील ही आजवरची सर्वात मोठी राष्ट्रव्यापी निदर्शने आहेत. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये हजारो लोकांची नोकरकपात, सामाजिक सुरक्षेला कात्री, अनेक विभाग बंद करणे, अमेरिकेत बेकायदा स्थलांतराची परत पाठवणी, तृतीयपंथीय लोकांच्या सुरक्षेत कपात, विशेष म्हणजे आरोग्य योजनांच्या निधीला कात्री, यामुळे जनमानस ढवळून निघाले आहे. अशातच अनेक देशांना आयात शुल्क मोठ्या प्रमाणात लागू केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या धोरणात जर योग्य बदल केले नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगतिले आहे. ट्रम्प यांनी जे आयात शुल्क लावले आहे, त्या विरोधात चीन व कॅनडा या देशांनी प्रत्युत्तर म्हणून कारवाईची घोषणा केली आहे. ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेसाठी आणि जगासाठी मंदीच्या खाईत लोटणारी आहेत.
 
शांताराम वाघ, पुणे 
 
आकांडतांडव कशाला?
 
भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना वर्धा येथील राम मंदिरात साधे कपडे असल्यामुळे व गळ्यात जानवे नसल्यामुळे गाभार्‍यात प्रवेश करण्यास नकार दिला. हे तेथील पुजार्‍यांनी योग्य तेच केले. यात पुजार्‍यांची काय चूक? मंदिर समितीने जे नियम केलेले असतील, ते सर्वांना पाळणे बंधनकारक आहे. मग तो आमदार असो अथवा खासदार! देवाच्या दरबारात सामान्य माणूस व खासदार-आमदार हे सगळे सारखेच. या ठिकाणी संतप्त होऊन, अथवा थयथयाट करून काहीच उपयोग नाही. दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात देवस्थान समितीला नाईलाजाने भाविकांसाठी अंगभर कपडे घालण्याची बंधने घालावी लागली. महाराष्ट्रातील इतर काही मंदिरात, उदा: कोल्हापूर, तुळजापूर असो येथील मंदिरात जे नियम केले आहेत. त्यानुसार भाविकांनी त्यावर टीका न करता ते पाळणे गरजेचे आहे. त्यावरुन आकांडतांडव कशाला?
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई  
 
कशासाठी ‘प्री वेडिंग’?
 
सध्या प्री वेडिंग म्हणजे विवाहाआधीचे चित्रीकरण हा एक नवा प्रकार आला आहे. खरेतर ही लग्नाआधीची आठवण असते. जोडप्याला एकमेकांना, अधिक चांगल्या प्रकारे ओळखणे फायदेशीर ठरते; मात्र ती एक खाजगी बाब असते. मग त्याचा समाजासमोर दिखावा का करावा? असे छायाचित्रण रिल्स व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स याद्वारे प्रसारित केले जातात; मात्र आपल्या खाजगी आयुष्याबद्दल समाजाला का सांगावे किंवा दाखवावे? खरेतर आज जगात दिखावा करणे घातकी झाले आहे. कोणीही त्याचा दुरुपयोग करु शकतो किंवा त्याची मानहानी करू शकतो. वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेता या गोष्टी करणे धोकादायक ठरू शकतात.
 
प्राची जोगळेकर, पुणे
 
प्रवाशांकडून खंडणी?
 
कामानिमित्त मला बर्‍याच ठिकाणी रेल्वेतून प्रवास करावा लागतो. मुख्य स्टेशन सोडल्यानंतर साधारणत: अर्धा तासाने तृतीयपंथाचे टोळके बोगीत दाखल होते. प्रत्येक प्रवाशाकडून २० रुपयांची ते मागणी करतात. पैसे देण्यास नकार दिल्यास शिव्या देणे, मारहाण करणे, अश्लिल भाषा वापरणे, धमकी देणे अशा प्रकारचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. अशा घटनांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास मोबाइल हिसकावून घेतात. ते कोणत्याही प्रकारचे तिकीटही काढत नाही. हा एक प्रकारे खंडणी वसूल करण्याचा प्रकार आहे! रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून कोणतीही कारवाई होत नाही. तरी रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन तृतीयपंथाचा होणारा त्रास कमी करून प्रवाशांना दिलासा द्यावा.
 
त्रस्त प्रवासी, पुणे
 
अवकाळीने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला
 
उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागांत हजेरी लावली. या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने हजारो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाचा काढणीला आलेल्या शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा पीक काढणीला आल्याने या अवकाळीचा सर्वाधिक फटका कांद्याला बसला आहे. भाजीपाला, तसेच फळबागादेखील वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. याशिवाय गहू आणि मका या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles