मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत   

आदित्यनाथ यांचे विधान;  महाकुंभचे दिले उदाहरण 

लखनौ : राजकारण माझा पूर्णवेळ धंदा नाही, पक्षश्रेष्ठांसोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत, मुस्लिम धर्मीयांनी हिंदू धर्मीयांकडून धार्मिक शिस्तीचे धडे घ्यावेत, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. राज्याच्या विकासातील वाटा सर्वांना सारखाच आणि निश्चितच मिळेल; पण अल्पसंख्याक आहात म्हणून विषेश सवलत मिळणार नाही, असा इशारा त्यांनी मुस्लिम धर्मीय नागरिकंना दिला आहे. 
 
आदित्यनाथ यांनी पीटीआयला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ते म्हणाले, रस्त्यावर नमाज पठण किंवा कोणतेही बेकायदा कृत्य करणार्‍याची गय केली जाणार नाही. त्यांना बुलडोझरच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. वक्फ मंडळावर टीकेची झोड उठविताना ते म्हणाले, सरकारी मालमत्ता बळकावणार्‍या मंडळाने समाजाला कोणताही लाभ दिलेला नाही. किमान सर्व मुस्लिम धर्मीयांना तसा लाभ दिला आहे का?
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नसताना देखील देशभरात लोकप्रियता वाढत असताना पक्ष श्रेष्ठांसोबतचे संबंध बिघडल्याची अफवा पसरली आहे, पंतप्रधान होण्याचे ध्येय, हिंदीला राष्ट्रभाषा बनविण्याचे स्वप्न आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य या विषयांवरील प्रश्नांना योगी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले,  राजकारण माझा पूर्ण वेळ धंदा नाही. मी हृदयाने साधू आहे. समर्थक मला भविष्यातील पंतप्रधान मानतात. आणखी किती वर्षे राजकारणात राहणार ? या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळ असतो. सध्या मी मुख्यमंत्री असून नागरिकांनी मला सेवेसाठी निवडले आहे. 
 
साधू ते राजकारणी या प्रवासात भाजपचे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून तुमचा उदय झाला आहे. कट्टर हिंदुत्ववादी, गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि दयामाया न दाखविणारा नेता, अशी प्रतिमा निर्माण असली तरी मी मुस्लिम धर्मीयांशी कधीही भेदाभाव केला नसल्याचे ते म्हणाले. राज्यातील लोकसंख्येत २० टक्के मुस्लिम धर्मीय आहेत. सरकारच्या कल्याणकारी योजनेतील त्यांचा लाभाार्थी वाटा ३५ ते ४० टक्के आहे. असे असले तरी भेदभाव आणि अनुनयाचे राजकारण केले नाही. 
 
धार्मिक शिस्तीचे सर्वोत्तम उदाहरण 
 
मेरठ येथील रस्त्यावरील नमाज पठणास प्रशासनाने विरोध केला होता. त्यावर ते म्हणाले, रस्ते पादचार्‍यांसाठी असतात. प्रशासनाच्या निर्णयाला जे विरोध करत असतील तर त्यांनी हिंदू धर्मीयांकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात ६६ कोटी नागरिक आले होते. तेव्हा चोर्‍या मार्‍या, मालमत्तेची हानी, लूटमार किंवा अपहरणाची एकही घटना घडली नाही. धार्मिक शिस्त काय असते, याची प्रचीती महाकुंभ मेळ्यात दिसली. तुम्हाला लाभ हवे असतील तर शिस्तीचे पालन करावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles