शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त   

वृत्तवेध 

फेब्रुवारीमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमती मासिक आधारावर पाच टक्क्यांनी कमी झाल्या. भाजीपाला आणि ब्रॉयलरच्या दरात झालेली घट हे त्यामागील कारण आहे. ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अ‍ॅनालिसिस’ने आपल्या मासिक ‘रोटी राइस प्राइसेस’ अहवालात म्हटले आहे की कांदा, बटाटा आणि टोमॅटोची जादा आवक झाल्यामुळे किमती अनुक्रमे सात टक्के, १७ टक्के आणि २५ टक्क्यांनी घसरल्या आहेत. याशिवाय दक्षिण भारतात ‘बर्ड फ्लू’च्या भीतीने कमी मागणीमुळे ब्रॉयलरच्या किमतीही सुमारे पाच टक्क्यांनी घसरल्या आहेत.
 
‘क्रिसिल इंटेलिजन्स’चे संचालक (संशोधन) पी. शर्मा म्हणाले की भाजीपाला, विशेषत: कांदा, टोमॅटो आणि बटाटे यांच्या किमती उतरल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीत घट झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या बाबतीत ब्रॉयलरच्या किमती कमी झाल्यामुळे दरात घट झाली आहे; मात्र वार्षिक आधारावर, फेब्रुवारीमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत एक टक्क्याने घट झाली तर मांसाहारी थाळीची किंमत जवळपास सहा टक्क्यांनी वाढली. टोमॅटो आणि एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) सिलिंडरच्या किमतीत घट झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीत घट झाल्याचे म्हटले जात आहे. टोमॅटोचे दर वर्षभरात २८ टक्क्यांनी घसरून २३ रुपये प्रति किलोवर आले आहेत. एका वर्षापूर्वी ते ३२ रुपये प्रति किलो होते. त्याचे कारण म्हणजे आवक २० टक्के वाढली आहे. ब्रॉयलरच्या किमतीत अंदाजे १५ टक्के वार्षिक वाढ झाल्यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत वाढ झाली. मांसाहारी थाळीच्या खर्चात ब्रॉयलरचा वाटा सुमारे ५० टक्के आहे.
 
अहवालानुसार, मक्याच्या किमतीत वर्षभरात सहा टक्के वाढ झाल्यामुळे खाद्याच्या किमती वाढल्या. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतात प्रचलित असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीच्या आधारे घरी थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च काढला जातो, असे ‘क्रिसिल’ने म्हटले आहे. मासिक बदल सामान्य माणसाच्या खर्चावर परिणाम दर्शवतात. थाळीच्या किमतीत बदल घडवून आणणार्‍या पदार्थांमध्ये तृणधान्ये, कडधान्ये, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅसचा समावेश होतो.

Related Articles