शहरात होळी, धुळवड उत्साहात   

पुणे : होळीच्या होमामध्ये दारिद्र्य, निराशेचे दहन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी, शुक्रवारी शहरात विविध रंगाची उधळण करून पुणेकरांनी धूळवड अर्थात धुलिवंदन उत्साहात साजरी केली. शहरात विविध भागांमध्ये लहानग्यासह आबालवृद्धांनी एकमेंकांना रंग लावत धूळवळ साजरी केली.
 
फाल्गुन पौर्णिमेला गुरुवारी सायंकाळी शहर परिसरात होळीचा होम पेटवण्यात आले होते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीची पूजा करण्यात आली. त्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालण्यात आली. होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी मोठ्या उत्साहात धूळवड साजरी करण्यात आली.
 
शहर परिसरातील विविध रस्त्यावर, चौकांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यत रंगात न्हाऊन निघाले होते. लहान मुले पिचकारीद्वारे रंग उडविण्याचा आनंद लुटत होते. कृत्रिम रंगामध्ये रासायनिक घटकांचा समावेश असल्याने त्या रंगाचा वापर करण्यात येऊ नये, असे सामाजिक संस्थांसह वैद्यकीय तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक जणांनी नैसर्गिक रंगाचा वापर करणे पसंत केले. शहरातील फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता यासह शहर परिसरात दुचाकीवरून तरुणाईंची रंग लावण्यासाठी गर्दी दिसून आली.
 
भोई प्रतिष्ठानच्या वतीने ’रंग बरसे’ हा धुलिवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लहान मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेष मुलांनी विविध रंगाची उधळण करीत धूळवडीचा आनंद लुटला. रंगबरसे या उपक्रमाचे यंदाचे ३० वे वर्ष होते. उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते झाले.  प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई  म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून समाजातील विशेष मुलांसोबत रंगबरसे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदा अडीच हजाराहून अधिक विशेष मुले या उपक्रमात सहभागी झाले.
 

Related Articles