जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी   

पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जलपर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपर्यटन, ग्रास लँड सफारी, आदीबाबींचा विचार करुन सर्वसमावेशक, पर्यावरणपूरक पुणे जिल्हा समग्र पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित एकत्रित पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन उपसंचालक शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दानी आदि उपस्थित होते.
 
डुडी म्हणाले, पर्यटन विकास आराखड्यात संगणकीकृत पायाभूत सुविधेच्या माध्यमातून पर्यटकांना पर्यटन स्थळांवरील प्रवेश शुल्क, निवास व्यवस्था, अल्पोपहार, भोजनालय, पिण्याचे पाणी, थांब्याचे ठिकाण, शौचालय आदि सुविधांबाबत सर्व प्रकारची माहिती मिळाली पाहिजे. पर्यटन स्थळाला देश विदेशातील अधिकाधिक पर्यटक भेट देतील. येणार्‍या पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील, या दृष्टीने प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करावे. देशातील इतर राज्यात करण्यात येणार्‍या पर्यटन महोत्सवाचा अभ्यास करावा. यासाठी नामांकित वास्तुविशारद, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी.या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निश्चित करण्यात आली. त्या दृष्टीने इको टूरिझम, साहसी खेळ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपरंपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य, तसेच पर्यटकांना आकर्षित करणार्‍या बाबींवर चर्चा करण्यात आली.

Related Articles