लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी   

कॅनडाच्या पंतप्रधानपदासाठी नाव निश्चित

टोरँटो : कॅनडाच्या पंतप्रधानपदी मार्क कार्नी यांची नियुक्ती होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. लिबरल पक्षाच्या नेतेपदी त्यांची बहुमताने काल निवड झाली. त्यामुळे ते मावळते पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचे उत्तराधिकारी होणार आहेत. 
 
मार्क कार्नी हे माजी बँक अधिकारी आहेत. त्रुदो यांच्या राजीनाम्यच्या पार्श्वभूमीवर लबरल पक्षाने नेता निवडीसाठी निवडणूक घेतली. कार्नी यांना ८५.९ टक्के मते पडली. जस्टीन त्रुदो यांनी पंतप्रधान पदाचा गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता.. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर २५ टक्के वाढीव आयात शुल्क लागू केले आहे. तसेच कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी बँकर असलेले मार्क यांची निवड करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, काहीजण देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका जोपर्यंत कॅनडाचा आदर करत नाही तोपर्यंत आम्ही देखील वाढीव आयात शुल्क आकारून उत्तर देणार आहे. कॅनडा कोणाच्या सांगण्यावरून अमेरिकेविरोधात व्यापार युद्धात उतरलेला नाही. ते आमच्यावर लादले गेले आहे. व्याापार युद्धाचा फटका देशातील कुटुंबे, कर्मचारी आणि उद्योगांना बसणार आहे. त्यासाठी देश तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 
 
दरम्यान, कार्नी बँक ऑफ कॅनडाचे २०१३ मध्ये मुख्य अधिकारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये कॅनडाच्या अर्थव्यवस्थेने अन्य देशांच्या तुलनेत मोठी प्रगती केली होती. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडने त्यांना अधिकारी पद दिले. पण, कार्नी यांच्या रुपाने परदेशी नागरिकाची अधिकारी पदी नियुक्ती केल्याने ब्रिटनमध्ये वाद झाला होता. त्रुदो यांच्या राजवटीत अन्नधान्य आणि घरांच्या किंमती आकाशाला भीडल्या होत्या. त्यामुळे त्रुदो यांची लोकप्रियता घटली. त्यामुळे नव्या नेत्याची निवड करण्यात आली, असा आरोप हुजूर पक्षाने केला आहे. कॅनडात लवकरच सार्वत्रिक निवडणूक होत आहे.  त्या पार्श्वभूमीवर लिबरल पक्षाने मार्क याची निवड करुन ते त्रुदो यांचे उत्तराधिकारी असतील, असे चित्र निर्माण केले आहे. बॅक अधिकारी असल्याने ते अमेरिकेशी टक्कर देतील, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केला जात आहे. त्रुदो यांना पदावरून काढून टाकून नवा चेहराही लिबरल पक्षाने देत विरोधी पक्षांवर एक प्रकारे दबाव निर्माण केला आहे.  

Related Articles